अध्ययन पद्धती
(Methods of Learning)
अध्ययन म्हणजे शिकणे होय. सर्वच व्यक्तींना जीवन जगत असतांना बऱ्याच गोष्टी शिकून घ्याव्या लागतात. बऱ्याचदा परिस्थितीशी समायोजन साधणे कठीण होवून जाते. म्हणून व्यक्तीला विशिष्ट कार्य येण्यासाठी त्याचे अध्ययन करुन घेणे आवश्यक असते. प्रत्येक व्यक्तीत असे अध्ययन करण्याचे मार्ग वेगवेगळे दिसून येतात. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने शिकत असतो. अशा अध्ययनाच्या पद्धती कोणत्या ते पुढील मुद्यांवरुन लक्षात येते.
१) प्रयत्न प्रमाद पद्धती (Method of Trial and Error)
२) अभिजात अभिसंधान पद्धती (Classical Conditioning)
३) साधक अभिसंधान पद्धती (Operant Conditioning):
४) अनुकरण पद्धती (Method of Imitation) :
५) बोधात्मक अध्ययन (Cognitive Learning) :
६) निरिक्षणात्मक अध्ययन (Observation Learning):
१) प्रयत्न प्रमाद पद्धती (Method of Trial and Error) :
कोणतेही कार्य शिकावयाचे असल्यास लगेच शिकले जात नाही. सुरुवातीपासून थोडे-थोडे कार्य शिकत शिकत अंतिम शिकण्यापर्यंत व्यक्ती पोहचत असतो. व्यक्ती शिकत असताना सुरुवातीला चुकत चुकत शिकत असतो. या प्रथमतः होणाऱ्या चुका नंतरच्या कालावधीत कमी होतात. यास प्रयत्न प्रमाद पद्धती असे म्हणतात.
अध्ययनाच्या बाबतीत थॉर्नडाईक यांनी महत्वपूर्ण प्रयोग केला तो खालीलप्रमाणे -
थॉर्नडाईक यांनी मांजरावर प्रयोग केला. त्यासाठी त्यांनी एक कूटपेटी (BOX) तयार केला. या कूटपेटीतून बाहेरचे दिसेल अशी त्यांनी व्यवस्था केलेली होती. या कूटपेटीच्या बाहेर एक मासाचा तुकडा ठेवला होता. या कूटपेटीत एक तारेची कळ (BUTTON ) होती ज्यावरती पाय पडताच पेटीचा दरवाजा उघडला जात असे.
सुरुवातीला मांजर कूटपेटीत (BOX) मधे बरेच इकडेतिकडे फिरत असे. प्रसंगी हात, पाय, जीभ काढूनही ते अन्न मिळविण्याचा प्रयत्न करीत असे. मांजराने खूप प्रयत्न करुनही ते अन्न प्राप्त झाले नाही. अचानक त्याचा पाय त्या कळीवर (BUTTON) वर पडला आणि दरवाजा उघडला गेला. दरवाजा उघडताच मांजराने मांसाचा तुकडा हस्तगत केला.
दुसऱ्यांदा अशाच प्रकारे मांजराला कूटपेटीत ठेवण्यात आहे. आधीसारखी स्थिती निर्माण करण्यात आली. यावेळी आधीपेक्षा थोड्या कमी चुका झाल्या. अशाप्रकारे वारंवार प्रयोग करण्यात आला. प्रत्येक प्रयोगाच्या वेळी मांजराच्या चुका ह्या कमी कमी होत गेल्या. यातूनच मांजर शेवटी लगेच कळ (BUTTON) दाबून अन्न मिळविण्याचे शिकला. अशा प्रकारे अनेक क्रियात्मक बाबी आपण अशाच प्रकारे शिकत असतो. सायकल शिकणे, टूव्हीलर शिकणे, टायपिंग शिकणे, संगणक शिकणे, सुतारकाम शिकत असतो. शिकणे, नृत्य शिकणे इ. बाबी प्रयत्न प्रमाद पद्धतीद्वारेच आपण शिकत आसतो.
थॉनेंडाईक यांनी याबाबत तीन नियम सांगितलेले आहेत. ते पुढीलप्रमाणे-
१) वारंवारीतेचा नियम (Law of Frequency) -
एखादी क्रिया शिकतांना वारंवार तीच क्रिया वा तेच प्रयत्न केले जातात. असे प्रयत्न व्यक्तीला सुखद अनुभव देवून जातात. समाधान देवून जातात अशी क्रिया समाधान देत असेल तर नक्कीच तीच क्रिया वारंवार केली जाते. तोच अनुभव प्रयत्न करुन वारंवार घेतला जातो. या वारंवार अनुभव घेण्याच्या क्रियेत उद्दिपक प्रतिक्रिया असा सहसंबंध प्रस्थापित होत असतो. एखाद्या वेळी आपण सहजच गाण्याचे एखादे कडवे म्हणतो आणि सोबतची मित्रमंडळी 'छान, फारच छान' म्हणून दाद देतात. अशा दाद मिळण्याने आपण कधीही आणि वेळ मिळाल्यास ते गाणे म्हणत असतो. इतराची शाबासकीची थापसुद्धा व्यक्तीला वारंवार ती क्रिया करण्यास उद्युक्त करीत असते.
२) परिणामाचा नियम (Law of Effect) -
व्यक्तीने एखादी क्रिया केल्यानंतर त्याचा परिणाम कसा झाला यावरही ती क्रिया होईल की नाही हे अवलंबून असते. एखादी क्रिया व्यक्तीने केल्यानंतर व्यक्तीला त्या क्रिया करण्यातून उद्दिष्ट प्राप्त होत नसेल तर व्यक्तीला समाधान मिळत नाही. यातून व्यक्तीला निराशा येवून व्यक्ती ती क्रिया करणे टाळते. दुसऱ्या परिस्थितीत क्रिया केल्यानंतर उद्दिष्ट प्राप्त होते त्याचबरोबर व्यक्तीला समाधान प्राप्त होत असते. त्यामुळे अशी क्रिया व्यक्तीकडून परत परत घडते. यालाच पहिल्या क्रियेला 'संतोषाचा नियम' म्हणतात. तर दुसऱ्या क्रियेला 'असंतोषाचा नियम' असे म्हणतात. लहान मूलसुद्धा अशाच प्रकारे शिकत असते. आपल्या केलेल्या कृतीचा ते परिणाम पाहते. कृती प्रशंसनीय असल्यास ती कृती पुन्हा पुन्हा करते. कृतीला प्रतिसाद न मिळाल्यास ती टाळण्याचा सुद्धा प्रयत्न करते.
३) सज्जतेचा नियम (Law of Readiness) -
एखादी कृती, क्रिया करण्यासाठी व्यक्ती कितपत तयारीत आहे वा कितपत सज्ज आहे यावरही उद्दीष्ट प्राप्त करणे ठरत असते. म्हणजेच व्यक्तीमध्ये मानसिक व शारीरिक सज्जता आवश्यक आहे. समोर उद्दिष्ट प्राप्त करायचे आहे. आणि व्यक्ती त्यासाठी कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलत नसेल तर ते उद्दिष्ट साध्य होणारच नाही. मुलाला दहावीला पास व्हायचे आहे. परंतु तो जर त्यासाठी अभ्यास करत नसेल, मेहनत घेत नसेल तर परीक्षेत पास होणे हे ठरविलेले उद्दिष्ट तो प्राप्तच करु शकणार नाही. शिक्षणाने प्रेरीत झालेले काही विद्यार्थी ग्रंथालयात जातात, अभ्यास करतात, अभ्यासाच्या वेळेचे नियोजन करतात आणि तयारी करुन परीक्षेला समोर जातात आणि परीक्षेत उच्च श्रेणीत पास होतात. ध्येयवेडे असणे हे मानसिक व शारीरिक सज्जतेमुळे शक्य होते.
२) अभिजात अभिसंधान पद्धती (Classical Conditioning)
व्यक्ती बऱ्याच क्रिया-प्रक्रिया ह्या अभिजात अभिसंधानामुळे शिकत असतात. या अभिजात अभिसंधानाचे जनक रशियन शरीरशास्त्रज्ञ इव्हान पॅवलॉव्ह हे आहेत. त्यांनी अनअभिसंधीत उद्दीपक व अभिसंधीत उद्दीपक यांच्यात साहचर्य निर्माण होवून व्यक्तीच्या क्रिया कशा घडून येतात याबाबत प्रयोग केले. त्यांचा कुत्र्यावरील प्रयोग हा अतिशय प्रचलित आहे.
अभिजात अभिसंधान कसे होते? हे पाहण्यासाठी पॅवलॉव्ह यांनी प्रयोग करण्यासाठी साहित्याची मांडणी केली. प्रयोगशाळेत कुत्र्याला आणले गेले. या कुत्र्याच्या तोंडाला ऑपरेशनद्वारे एक नळी बसविण्यात आली. जेणेकरून त्याचा उपयोग लाळ चचूपात्रात येण्यासाठी होईल. या नळीद्वारे जमा होणाऱ्या लाळेची मोजणी होईल अशी व्यवस्था त्यांनी केली होती. कुत्र्याला प्रयोगशाळेतील परिस्थितीची सवय करून दिली. कारण त्यामुळे प्रयोगामध्ये चांगले निकाल मिळतात. वातावरण हे शांत राहील अशी व्यवस्था सुद्धा पॅवलॉव्ह यांनी केलेली होती.
कुत्रा त्या टेबलावर सुव्यवस्थितपणे उभा राहावा यासाठी त्यांनी कुत्र्याला पट्ट्यांनी बांधून ठेवलेले होते. कुत्र्याला बाहेरचे काहीही दिसणार नाही मात्र कुत्रा काय करतो आहे हे पाहण्यासाठी पॅवलॉव याने एकदर्शी काच बसविलेली होती. पॅवलॉव यांनी प्रयोगाच्या सुरुवातीला घंटीचा आवाज केला यावेळी कुत्र्याने कशाचा आवाज आहे म्हणून इकडे तिकडे पाहिले. त्याच्या पुढे अन्न दिसेल आणि तो ते अन्न आल्यानंतर खावू शकेल अशी त्यांनी व्यवस्था केलेली होती. त्यानंतर त्याच्यासमोर अन्नाची गोळी देण्यात आली. कुत्र्याने जसे अन्न पाहिले तसेच त्याच्याकडून लाळ निर्मिती व्हायला सुरुवात झाली. अशा पद्धतीने घंटीचा आवाज व त्यानंतर अन्न देणे असे वारंवार पॅवलॉव यांनी घडवून आणले. आता मात्र पॅवलॉव यांनी समीकरण बदलविले. घंटीचा आवाज केला मात्र अन्न दिले नाही. तरीही कुत्र्याच्या तोंडातून लाळ स्त्रवू लागली. आतापर्यंत अन्न दिल्याशिवाय लाळ स्त्रवण होत नव्हते मात्र आता अन्न न देताच लाळ स्त्रवू लागली. म्हणजेच कुत्र्याची लाळेची प्रतिक्रिया ही आधी अन्नासोबत जुळलेली होती आता मात्र घंटीच्या आवाजासोबत लाळेचे समीकरण प्रस्थापित झाले. या प्रयोगामध्ये पुढील आकृतीत दाखविल्याप्रमाणे पायऱ्यांनी क्रियावर्तन घडलेले दिसून येते.
Social Plugin