स्मृती (स्मरण), स्मृती प्रक्रिया, प्रारुपे

स्मृती / स्मरण व्याख्या

वुडवर्थ आणि मार्कविस यांच्या मते, "पूर्वाध्ययनांची आठवण होणे म्हणजे स्मृती / स्मरण होय. "

स्टाऊट यांच्या मते, "पूर्वानुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मृती किंवा स्मरण होय. " 

गिलफोर्ड यांच्या मते, “स्मृती / स्मरण म्हणजे धारणाशक्ती होय

किंवा कोणत्याही प्रकारे माहितीची केली जाणारी साठवण होय." 

सी. जी. मॉरीस यांच्या मते, “केलेल्या अध्ययनाला जतन करुन ठेवण्याची प्रक्रिया म्हणजे स्मरण होय.'


स्मृती प्रक्रिया (Memory Process)

स्मृती प्रक्रिया लगेच घडून येत नाही तर ती विशिष्ट अशा पायरीने सिद्ध होत असते. ते खालीप्रमाणे


१) संकेतन(Encoding) :

स्मृती प्रक्रियेतील ही पहिली पायरी आहे. व्यक्ती ज्ञानेंद्रियांमार्फत वेगवेगळे अनुभव घेत असते. तसेच्या तसे अनुभव हे स्मृतीत साठविले जात नाही. उदा. एखादे घर पाहत असतांना तसेच ते चित्र स्मृतीमध्ये ठेवले जात नाही व ऐकतांना एवढी मोठी गाणी ही त्यात बसविली जात नाही तर विविध ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून मिळणारे अनुभव हे खाणाखुणा, विविध चिन्हे, आकार, रचना, उसे या स्वरुपात ते साठविले जात असतात.

अशा या चिन्हांच्या स्वरुपात अनुभव स्मृतीत साठविले जात असतात. स्मृतीतील संकेतनाचा हा प्राथमिक भाग अतिशय महत्वाचा आहे. म्हणजेच अनुभवाचे सोईस्करपणे रुपांतरण करुन जी चिन्हे किंवा खुणा मानवी स्मृतीत जपून ठेवल्या जातात त्यास संकेतन म्हणतात.


२) साठवण (Storage) :

स्मृती प्रक्रियेतील हा दुसरा टप्पा आहे. संकेताद्वारे नोंद घेतलेल्या माहितीपैकी शिल्लक राहिलेल्या माहितीला जतन करुन ठेवण्याची प्रक्रिया म्हणजे साठवण होय. याला 'स्मृतीसंचय' या नावाने सुद्धा ओळखले जाते.

माहिती ही संकेताच्या स्वरुपात साठविली जाते. ही माहिती संकेताच्या स्वरुपात स्मृतीत आल्यानंतर त्यावर विशिष्ट अशी क्रिया होते. ती संकेताने पद्धतशीर व सुव्यवस्थितपणे स्मृतीत ठेवली जाते. व्यक्तीला जेवढे जास्त अनुभव मिळालेले असतात तेवढ्या जास्त प्रमाणात स्मृतीची साठवण होत असते. असे हे अनुभवाच्या माध्यमातून मिळालेल्या संकेतनाचे जतन योग्य पद्धतीने होणे अतिशय आवश्यक असते. अशी ही संकेतने व्यवस्थितपणे साठविली गेली तर योग्य त्या वेळी स्मृतीतील माहिती आपणास वापरता येते. अशी ही सर्व साठवणाची क्रिया मेंदूतील प्रमस्तिष्क बाह्यकांवर होत असते.


३) प्रत्यानयन (Retrieval) :

स्मृती प्रक्रियेतील तिसरा आणि सर्वात महत्वाचा टप्पा म्हणून प्रत्यानयनाकडे पाहिले जाते. यालाच 'पूर्वानुभव आठवणे' किंवा 'पुनःप्रापण' असे म्हणतात. जतन केलेल्या माहितीचा पुनः प्रत्यय येणे म्हणजे प्रत्यानयन होय. प्रत्यानयन म्हणजे स्मृतीसंचयात दडलेली माहिती बाहेर काढून विचारार्थ घेणे असा त्याचा अर्थ घेतला जातो.

अशाप्रकारे स्मृती प्रक्रिया ही संकेतन, साठवण व प्रत्यानयन यातून पूर्ण होते. म्हणूनच पूर्वानुभवांचे संकेतन, साठवण व प्रत्यानयन म्हणजे स्मृती होय असे म्हटले जाते.


माहीती प्रक्रीयण प्रारुपे 
(Information Processing Models) :

स्मृतीच्या संदर्भात अनेक मानसशास्त्रज्ञांनी अध्ययन केलेले आहे.यातील काही महत्वाची प्रारुपे / सिद्धांत पुढीलप्रमाणे आहे.

१) दृढीभवन सिद्धांत 

(Theory of Consolidation) :

हेब यांनी दृढीभवन सिद्धांत मांडला. हेब यांनी यामध्ये स्मृतीचे दोन घटक सांगितले आहे. एक अल्पस्मृती व दुसरा दिर्घस्मृती होय. ज्ञानेंद्रियाद्वारे ग्रहण केलेली माहिती ही सर्वप्रथम अल्पस्मृतीमध्ये साठविली जाते. त्या माहितीची अर्थपूर्णरीत्या उजळणी झाल्यास दिर्घस्मृतीच्या स्वरुपात ती संस्कारीत होवून साठविली जाते. यामध्ये मेंदूतील पेशी सहाय्यभूत ठरत असतात. या पेशीच्या मदतीने माहिती ही ठशांच्या रुपात असतांना पेशीच्या रचनेत बदल होत असतो. असे झाल्यामुळे स्मृतीतील उसे है कायम स्वरुपात जतन होत असतात.

या सिद्धांतात अल्पकालीक स्मृती, दिर्घकालीक स्मृती तसेच मेंदूतील पेशींचे सहाय्य इ. घटक महत्वाचे मानले आहेत.


२) द्विस्मृती सिद्धांत:

वॉग आणि नॉर्मन (१९६५) यांनी द्विस्मृती सिद्धांत मांडलेला आहे. या सिद्धांतानुसार विविध प्रकारच्या उद्दीपनाने ज्ञानेंद्रिये उद्दीपीत होतात. उद्दीपकाची माहिती ज्ञानेंद्रियाकडून घेतली जाते. म्हणजे ती ऐंद्रिय स्मृतीत येते. यात थोडे लक्ष दिले वा संस्कार केले तर, उजळणी केली तर माहिती अल्पकालीक स्मृतीमध्ये येते. या अल्पकालीक स्मृतीत आलेल्या माहितीवर संस्करण, उजळणी झाली तर ती दिर्घकालीक स्मृतीमध्ये जाते. परंतु याकडे लक्ष दिले नाही वा संस्करण किंवा उजळणी झाली नाही तर त्या माहितीचे विस्मरण घडून येते. अल्पकालीक स्मृतीतीत माहिती ऐंद्रिय स्मृतीतून येते. ती माहिती नष्ट होत नसल्याचे कुठेही प्रतीत होत नाही. 

वॉग आणि नॉर्मन यांच्या द्विस्मृती सिद्धांतातील प्रतिकृती पुढीलप्रमाणे-



३) बहुलक प्रारूप (Mode Model):

बहुलक प्रारूप हे अॅटकिन्सन आणि शिफ्रीन यांनी मांडलेले आहे. अॅटकिन्सन आणि शिफ्रीन यांनी स्मृतीचे तीन प्रकार सांगितलेले आहे. वेदनीक स्मृती, अल्पकालीक स्मृती व दिर्घकालीक स्मृती असे हे तीन प्रकार आहे. यालाच त्यांनी 'साठवण भांडार' असे म्हटले आहे. या सिद्धांताची प्रतिकृती पुढे दिलेली आहे त्याप्रमाणे आहे.

या सिद्धांतानुसार आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांद्वारे ज्ञानेंद्रियांचे उद्दीपन होते. अशी या उद्दीपकाची माहिती ही वेदनीक स्मृतीत साठविली जाते. यामध्ये वेदनीक स्मृतीचे दोन प्रकार पडतात. एक प्रतिमा स्मृती व दुसरी प्रतीध्वनी स्मृती होय. वेदनीक स्मृतीची उद्दीपन माहिती साठवण क्षमता प्रचंड असते पण ती तिथे टिकण्याचा कालावधी हा १ सेकंदापर्यंत असतो.

अशा या माहितीकडे अवधान केंद्रित केले तरच ती माहिती अल्पकालीक स्मृतीत जाते. अल्पकालीक स्मृतीतील माहितीला अर्थ प्राप्त होत असतो.

ही माहिती स्मृतीत टिकण्याचा कालावधी १५ ते २५ सेकंद एवढा असतो. या माहितीवर विस्तारीत उजळणी झाल्यास ती माहिती दिर्घकालीक स्मृतीत साठविली जाते. या स्मृतीची साठवण क्षमता तसेच धारणा कालावधी हा प्रचंड असतो. या स्मृतीत साठविली गेलेली माहिती दिर्घकाळापर्यंत असते. या प्रारुपानुसार वेदनीक स्मृतीतील माहितीचे संस्करण झाल्यास एकदम ती दिर्घकालीक स्मृतीतही साठविली जाते. या तिनही स्मृतीच्या अनुषंगाने हे प्रारुप अतिशय महत्वाची रचना साकार करते.

४) संस्करण पातळी सिद्धांत 
(Level of Processing Approach) :

 हा सिद्धांत क्रेक व लॉकहार्ट यांनी मांडलेला आहे. हा सिद्धांत माहिती प्रक्रियणावर आधारीत आहे. यामध्ये माहिती प्रक्रियणाची प्रक्रिया म्हणजे माहितीचे संस्करण मानले आहे. हे संस्करण उथळ स्वरुपात झाले तर ती माहिती अल्पकाळापुरती साठविली जाते. परंतु हे संस्करण सखोल झाले तर ती माहिती कायमस्वरुपी स्थिर होते. या सिद्धांतामध्ये आराखडा पुढीलप्रमाणे आहे.


या सिद्धांतामध्ये संवेदन, संरचनात्मक, अर्थ आणि विस्तारीकरण या प्रक्रिया मानल्या आहेत. ज्ञानेंद्रियाद्वारे विविध उद्दीपकांचे उद्दीपन होवून संवेदन घडून येते. या उद्दीपक घटकावर अधिक लक्ष दिल्यास त्या उद्दीपक वस्तूबाबत अनेक पैलू माहित होतात. यावर आणखी सखोल विचार केल्यास त्याचा अर्थ स्पष्ट होण्यास मदत मिळते. ती माहिती कोणती आहे याबाबत अर्थ कळल्यास पूर्वानुभवातील माहितीशी त्याचा संबंध जुळविला जातो. यामुळे माहितीचे ठसे आणखी मजबूत होतात. अभ्यासाच्या संदर्भात हा सिद्धांत तंतोतंत लागू पडतो.. उदा. नवीन गाडी डोळ्याने दिसताच कोणती आहे? कशी आहे? त्याबाबत अनेक निकष उभे होतात. मग त्याचा अर्थ कळतो ही गाडी आहे. त्यातून अनेक गाड्यांशी त्याचा संबंध जुळवून कोणत्या गटातील आहे किंवा नवीन आहे त्याबाबत कायमस्वरुपी माहिती साठविली जाते.


५) समांतर वितरीत संस्करण दृष्टीकोन 
(Parallel Distributed Processing):

हा सिद्धांत मॅक्लीलँड आणि रुमेल हार्ट यांनी मांडलेला आहे. या सिद्धांताला 'अनुबंध वाद' या नावानेही ओळखले जाते. यामध्ये मज्जापेशी व स्मृतीतील प्रक्रिया यातील सहसंबंध जुळविण्याचा प्रयत्न केलेला आहे.

व्यक्तीच्या चेतासंस्थेत अनेक चेतापेशी एकमेकांशी जुळलेल्या दिसतात. त्याचप्रमाणे ही माहितीचीही बोधनिक प्रक्रिया एक बोधसंस्था आहे. यात अनेक बोधनिक प्रक्रिया होतात. पण त्या ठिकाणीही चेतापेशींच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेसारखी असंख्य बोधनिक प्रक्रिया गुंतागुंतीची झालेली दिसून येते. जाणिवेच्या किंवा बोधनिकतेच्या प्रक्रिया म्हणजे वेदन व संवेदन होय, जें सर्व शरीरभर ज्ञानेंद्रियामार्फत होत असते. त्याची प्रक्रिया मेंदूच्या कोणत्याही भागाद्वारे केली जात नाही तर सर्वत्र मेंदभर ती प्रक्रिया घडून येते. तसेच बोधनिक पातळीवर मिळालेल्या माहितीची साठवण मेंदूतील एका विशिष्ट भागाद्वारे होत नाही तर सर्वच ठिकाणाहून होत असते. या सिद्धांतानुसार बोधन म्हणजे एक प्रकारचे असे जाळे, जे साध्या साध्या संस्कारामुळे तयार झालेले असते. ही रचना मेंदूतील चेतासंस्थेच्या चेतापेशीतील जाळ्यासारखीच दिसून येते. असे संस्करण होत होत ते एकमेकांशी मोठे जाळे निर्माण करीत असतात.

अशाप्रकारे संस्करण एककातील क्रियाप्रवर्तनामुळे विचार, संवेदन आणि स्मृती या क्रिया ह्या शक्य होत असतात. असे हे क्रियाप्रवर्तन वातावरणातून मिळणारे घटक व इतर एककाकडून मिळणारे घटक या दोन घटकावर अवलंबून असते. हा सिद्धांत अतिशय महत्वाचा पैलू मांडणारा आहे. त्यामुळे त्याचे महत्त्वाचे स्थान स्मृतीच्या सिद्धांतात आहे असे म्हणता येते.