मानसशास्त्रातील व्यवसायविषय मार्ग आणि मानसशास्त्राची क्षेत्रे (Career Avenues in Psychology & Field of Psychology)
दिवसेंदिवस मानसशास्त्राचा उपयोग जसजसा वाढतो आहे. त्याच बरोबरीने मानसशास्त्राचा विविध क्षेत्रामध्ये उपयोग सुद्धा होतो आहे. ज्या ज्या ठिकाणी आणि ज्या ज्या क्षेत्रात व्यक्ती कार्य करतो त्या त्या क्षेत्राशी मानसशास्त्र निगडीत झालेले दिसून येते. अशी मानसशास्त्राची कोणते क्षेत्रे आहेत हे पुढील मुद्यावरून लक्षात येईल.
१) चिकित्सा मानसशास्त्र (Clinical Psychology)
व्यक्तीला ज्या प्रकारे शारीरिक समस्या आहेत त्याचप्रकारे मानसिक समस्या सुद्धा आहेत. या मानसिक समस्या सोडविण्याचे कार्य शारीरिक समस्या सोडविण्याचे कार्य करणारे डॉक्टर सोडवू शकत नाही. त्यासाठी चिकित्सा मानसशास्त्रज्ञाची गरज असते. तसेच बरेचवेळा मनोविकृती चिकित्सकाची सुद्धा मदत घ्यावी लागते. चिकित्सा मानसशास्त्र हे व्यक्तीच्या मानसिक समस्येचा शोध घेण्याचे कार्य करते. एखादा व्यक्ती मानसिकरित्या पीडित आहे, ग्रस्त आहे. अशावेळी चिकित्सा मानसशास्त्रज्ञ त्या व्यक्तीकडून व्यक्तीला भेडसावणारी समस्या विचारतो, त्यावर विचार करतो. आणखी माहिती लागत असल्यास त्याच्या घरातील व्यक्तीकडून तो माहिती गोळा करतो, काही प्रसंगी शेजारील व्यक्तीकडून सुद्धा माहिती गोळा केली जाते. या सर्व बाबींचे चिकित्सक सूक्ष्मरित्या परिक्षण करतो. सर्व बाबी लक्षात घेता व्यक्तीला निर्माण झालेली समस्या कशामुळे निर्माण झाली व यावर आता काय उपाय करावा याविषयी चिकित्सक मार्गदर्शन करतो.
२) औद्योगिक व संघटन मानसशास्त्र (Industrial & Organizational Psychology)
सद्यस्थितीत औद्योगिकरणाचे जाळे फार झपाट्याने विस्तारीत आहे. औद्योगिकरण जसे वाढत जाते तसतसे संघटन सुद्धा वाढत आहे यातूनच औद्योगिक व संघटन मानसशास्त्राची पायाभरणी झालेली आहे. औद्योगिकरणामध्ये विविध कार्य चालत असते. उद्योगामध्ये व्यक्ती हा महत्वाचा केंद्रबिंदू असतो. या उद्योगामध्ये व्यक्तीच्या विविध समस्या निर्माण होतात. त्या सोडविण्याचे कार्य औद्योगिक मानसशास्त्रज्ञ करीत असतात. समस्येच्या अनुषंगाने विविध संघटना नावारूपास येतात व सामुहिकरीत्या समस्या सोडविण्याचे कार्य त्या करीत असतात. या संघटनांना विकासाचे स्वरूप मिळावे यासाठी संघटन मानसशास्त्रज्ञ कार्य करीत असतात.
उद्योगामध्ये पदभरतीपासूनचे कार्य सुरू होते. पदाला लायक व्यक्ती, अर्हता, परिस्थिती, कामाचे ओझे, कमी वेळात जास्त काम अशा विविध बाबीवर औद्योगिक व संघटनविषय मानसशास्त्र कार्य करीत असते.
३) शैक्षणिक मानसशास्त्र (Educational Psychology)
शिक्षण ही प्रत्येक व्यक्तीची प्राथमिक गरज आहे. म्हणूनच संविधानाने शिक्षण हा व्यक्तीचा एक मूलभूत हक्क मानलेला आहे. शिक्षणाशिवाय व्यक्तीचा सर्वांगीण विकास शक्य नाही. हे सर्वांच्या लक्षात आल्याने शिक्षण ही सर्वात महत्वाची गरज निर्माण झालेली आहे.
पूर्व प्राथमिक शालेय स्तरापासून अभ्यासक्रमाची बांधणी करण्याचे महत्वाचे कार्य शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ करीत असतात. कोणत्या वर्गाला किती वेळाचा तास असावा ? किती वेळ सुट्टी असावी? याचा अभ्यास शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ करीत असतात. तसेच सामान्य मुलापेक्षा त्यांच्या मागे पडणारी मुले असतील तर त्यांच्यासाठी काय करता येईल. या सारख्या समस्यावर सुद्धा शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ कार्य करीत असतात. शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ मुलांना शैक्षणिक क्रमात ज्या समस्या निर्माण होतात त्या समस्या सोडविण्यासाठी शैक्षणिक मानसशास्त्रज्ञच मोलाचा कार्यभार पार पाडीत असतात.
४) सामाजिक मानसशास्त्र (Social Psychology)
व्यक्ती समाजामधील एक महत्वाचा घटक आहे. व्यक्ती-व्यक्तीच्या समुहापासून समाजाची निर्मिती होत असते. व्यक्तीच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी व्यक्तीला समाजाची गरज असते. सामाजिक परिस्थितीत असल्याने व्यक्तींना एकमेकाचा आधार वाटत असतो.
सामाजिक परिस्थितीचा व्यक्तीच्या सर्वांगीण बाबीवर प्रभाव पडीत असतो. व्यक्ती ज्या समाजात राहतो. त्या समाजामधील भाषा, प्रथा, परंपरा, नियम, नीती, आचारण इत्यादी गोष्टी शिकत असतो. यातून व्यक्तीच्या क्रिया प्रक्रियेवर परिणाम होत असतांना दिसतो. यातून व्यक्तीची अभिरूची, अभिवृत्ती, आंतर प्रक्रिया, आंतर विनिमय, संघर्ष, आवडीनिवडी ठरत असते. एकंदरीत समाज घटकाचा व्यक्तीवर कसा परिणाम होतो? व व्यक्ती त्याने कसा प्रभावीत होतो ? याचा अभ्यास सामाजिक मानसशास्त्रात केला जातो. सामाजिक क्षेत्रात निर्माण होणाऱ्या अनेक समस्या सोडविण्याचे कार्य सामाजिक मानसशास्त्रज्ञ करीत असतात.
५) वैकासिक मानसशास्त्रज्ञ (Developmental Psychology)
विकास होण्याची प्रक्रिया ही निरंतर चालणारी आहे. व्यक्तीचा बालपणापासून तर वृद्धवयापर्यंतचा विकास ही सातत्यपूर्ण असतो. व्यक्तीच्या एकएका अवस्थेचा अभ्यास करणे ही खूप मोठी प्रक्रिया आहे. एकंदरीत व्यक्तीचा विकास कसा होतो, त्यातील समस्या निर्मिती व सोडवणूक या बाबींचा अभ्यास वैकासिक मानसशास्त्रात केल्या जातो.
बाल्यावस्थेमध्ये मुलाची दिनक्रिया कशी असते ? त्याचा बोलणे, चालणे, शारीरिक व मानसिक विकास हा कसा होत जातो? त्यातील समस्या व त्यांची सोडवणूक इत्यादी प्रक्रिया वैकासिक मानसशास्त्रज्ञ करीत असतात. व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी काय प्रयत्न करायला हवे? यासाठी वैकासिक मानसशास्त्रज्ञ मदत करीत असतात. वृद्धापकाळ हा समस्येचा काळ मानला जातो तो काळ व्यवस्थित व सुखकर कसा करता होईल? यासाठी वैकासिक मानसशास्त्रज्ञ सुचवित असतात.
६) आरोग्य मानसशास्त्र (Health Psychology)
आरोग्य ही एक संपत्ती मानली गेली आहे. ज्याला आरोग्य चांगले लाभले आहे ती अधिक सुखी व आनंदी व्यक्ती मानली जाते. सध्याच्या युगात व्यक्ती फार धडपडतो आहे. व्यक्तीची कामासाठी पार पळापळ चाललेली आहे. यातून व्यक्तीत ताण, चिंता, नैराश्य, भीती, न्युनगंड इत्यादी गोष्टींनी घर केलेले आहे.
अशा परिस्थितीत मानसिक स्थिती बिघडत चाललेली आहे. त्याचबरोबरीने शारीरिक स्थिती सुद्धा विस्कळीत होत आहे. घरातील एका व्यक्तीवर असा परिणाम झाल्यास घरातील इतर व्यक्तीवरही याचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणूनच मानसिक स्वास्थ बिघडण्याबरोबर शारीरिक स्वास्थ सुद्धा बिघडत चाललेले दिसून येते. यातून वेगवेगळे सौम्य आजारापासून तर हार्टअॅटक, कॅन्सर इत्यादी गंभीर आजाराला समोर जावे लागत आहे. एकंदरीत अशा समस्या सोडविण्याचे कार्य आरोग्य मानसशास्त्रज्ञ करीत असतात व याचा अभ्यास आरोग्य मानसशास्त्रात केल्या जातो.
७) गुन्हेगारी मानसशास्त्र (Criminal Psychology)
लोकसंख्या बळीबरोबर गुन्हेगारीचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवसेंदिवस याचे प्रमाण कमी होण्यापेक्षा जास्तच होत चाललेले आहे. व्यक्तीनी केलेला गुन्हा हा सौम्य स्तरापासून तर गंभीर स्तरापर्यंत असतो. असा हा गुन्हा व्यक्तीकडून कसा घडतो? व्यक्तीची त्यावेळची स्थिती कशी असते? त्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरत असतात? आजूबाजूचे वातावरण याला जबाबदार आहे का? इत्यादी गोष्टीचा अभ्यास हा गुन्हेगारी मानसशास्त्रात केला जातो.
गुन्हेगारी शब्दाबरोबर व्यक्तीने केलेले वाईट वर्तन हे लक्षात येते. याकडे वाईट दृष्टीनेच व्यक्ती बघत असतात. यामुळे इतर व्यक्तीमध्ये भीती सुद्धा पसरत असते. या गुन्हेगारीचे प्रमाण कमी व्हावे तसेच व्यक्तीकडून गुन्हा हा घडू नये यासाठी गुन्हेगारी मानसशास्त्राचा अभ्यास करणारे चिकित्सक प्रयत्न करीत असतात.
८) न्याय सहायक मानसशास्त्र (Forensic Psychology) गुन्हा घडलेला असतो. अशा ठिकाणी ज्या व्यक्तीचा दोष नाही अशा व्यक्तीला न्याय मिळणे अपेक्षीत असते. खरोखरच न्यायीक व्यक्तीलाच साहाय्य मिळाले पाहिजे. तशीच भूमिका न्याय सहायक मानसशास्त्रज्ञाची असते.
अल्पवयीन आणि मानसिक ग्रस्त व्यक्ती यांच्या हातून सुद्धा गुन्हे घडत असतात. मग यांना सुद्धा सामान्य गुन्हेगारीप्रमाणे कठोर शिक्षा द्यावी काय? असा प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नाचा उलगडा व्यवस्थितरित्या करण्याच्या कार्य न्याय सहाय्यक मानसशास्त्रज्ञ करीत असतात. यामध्ये न्यायीक कार्य होण्यासाठी गुन्ह्यातील सामील व्यक्तीचे मत, त्याची मानसिक स्थिती, इतर साक्षीदार व्यक्तीचे म्हणणे, इत्यादी बाबींचा अभ्यास या शाखेत केला जातो. गुन्हेगारी क्षेत्रात योग्य ते गुन्हेगारी कमी होईल या दृष्टीने काय बदल करता येईल यासाठी न्याय साहाय्यक मानसशास्त्रज्ञ विचार विमर्श करीत असतात व त्यावर उपाययोजना आखतात.
९) सैनिक मानसशास्त्र (Military Psychology)
सैनिकी क्षेत्र फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे. परंतु तेव्हापासून फार मोठे बदल त्या क्षेत्रात होत आलेले आहे. अतिशय कठोर व काटेकोरपणाने वर्तन सैनिकी क्षेत्रात चाललेले असते. या सैनिकी क्षेत्रात सैनिकामध्ये निडरपणा हा महत्वाचा गुण अंतर्भूत असणे महत्वाचे असते. त्याशिवाय दुसऱ्या विरोधी देशाशी तो आत्मविश्वासाने लढूच शकणार नाही.
सैनिक क्षेत्रामधील समस्या, त्याचे जीवन, त्यांचे वर्तन, त्यांच्यावरील मानसिक ताण, चिंता, भिती, झोप, मानसिक आरोग्य व शारीरिक आरोग्य इत्यादी बाबीचा अभ्यास सैनिकी मानसशास्त्रात केला जातो. सैनिक एक व्यक्ती आहे. त्याच्या इच्छा, आकांक्षा, मानसिक स्थिती जाणून घेतल्याने त्यांच्याकडून देशहिताचे चांगले कार्य होवू शकते. या दृष्टीने सैनिक मानसशास्त्रज्ञ उपाययोजना सुचवितात.
१०) खेळ मानसशास्त्र (Sports Psychology)
भारतीय समाजामध्ये आधीपासूनच खेळाविषयीची आवड व्यक्तीमध्ये आहे. पारंपारिक खेळ आता दिसत नसले तरी खेळाविषयीची जागृकता कमी झालेली नाही. जीवनामध्ये एक तरी खेळ आवडीचा असून त्यात स्वतःचा सहभाग असावा जेणेकरून शारीरिकतेवर त्याचा योग्य परिणाम होतो व व्यक्तीला चांगल्या आरोग्याल जपता येते.
दिवसेंदिवस जीवन फार धावपळीचे झालेले आहे. त्यामुळे अनेक चिंता, ताणतणाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातून शरीरावर सुद्धा ताणतणाव वाढत आहे. आपले शरीर हे तणाव विरहीत राहावे यासाठी खेळ खेळणे महत्वाचे आहे. यातून शरीरावर असलेला ताण दूर केला जातो. शरीर हलके वाटते. मानसिक ताण यातून दूर होतो. आवडीनुसार कसा खेळ निवडावा? खेळाची आवश्यकता व शरीर व मनासाठी त्याचा फायदा काय? या बाबीचा अभ्यास खेळविषयक मानसशास्त्रात केल्या जातो.
११) चेता मानसशास्त्र (Neuro Psychology)
व्यक्तीच्या पूर्ण शरीरभर चेतापेशी आहे. या चेतापेशीचेच पूर्ण शरीर व्यक्तीचे बनलेले आहे. व्यक्तीचे सर्व ज्ञानेंद्रिये या चेतापेशीमुळे कार्य करू शकतात. व्यक्तीच्या मेंदुमध्ये सुद्धा चेतापेशीच आहे. कोणत्याही इंद्रियाद्वारे मिळालेला संदेश मेंदुपर्यंत पोहचविण्याचे कार्य चेतापेशीच करीत असतात तसेच मेंदुच्या कोणत्याही भागाने दिलेला संदेश इंद्रियापर्यंत पोहचविण्याचे कार्य चेतापेशीच करीत असतात. एकंदरीत चेतापेशीद्वारे होणारी प्रक्रिया ही कशा पद्धतीनी चालते. याचा अभ्यास या चेता मानसशास्त्रामध्ये केला जातो.
असे हे सूक्ष्म जैविक घटक आपल्या शारीरिक प्रक्रिया कशा पद्धतीने घडवून आणतात तसेच त्याचा व्यक्तीच्या मानसिक क्रियेवर कसा परिणाम होतो यामुळे व्यक्तीमध्ये कोणत्या शारीरिक व मानसिक समस्या उद्भवतात व त्याचे निराकरण कसे करायचे इत्यादीचे सूक्ष्म अध्ययन चेता मानसशास्त्रात केले जाते.
१२) पर्यावरण मानसशास्त्र (Environmental Psychology)
प्रत्येक व्यक्ती सभोवतालच्या पर्यावरण / वातावरणाशी संबंधीत आहे. अशा या पर्यावरणाचा परिणाम व्यक्तीवर होत असतो. या पर्यावरणामध्ये व्यक्तीसोबत हवा, पाणी, नैसर्गिक वायु, प्राणी, वृक्ष इत्यादी घटक संबंधीत आहे. अशा या पर्यावरणातील घटकाचा व्यक्तीवर कसा परिणाम होतो याचा अभ्यास पर्यावरण मानसशास्त्रात केला जातो.
व्यक्तीला ज्या प्रकारचे वातावरण/पर्यावरण मिळाले तसा व्यक्तीवर परिणाम होतो. अधिक सुसह्य पर्यावरण स्थितीमध्ये व्यक्ती शांत, संयमी असतो. मात्र शरीर व मनाच्या विरोधी पर्यावरण असल्यास व्यक्ती चिडचीड, राग व्यक्त करतो. व्यक्तीला चांगले शारीरिक व मानसिक आरोग्य लाभावे यासाठी पर्यावरण कसे असावे याचा विचार पर्यावरण मानसशास्त्रज्ञ करीत असतात.
१३) सकारात्मक मानसशास्त्र (Positive Psychology) सकारात्मक मानसशास्त्र म्हणजे अनेक मानवी पातळींवर सकारात्मक मानवी कार्यांचा शास्त्रीय अभ्यास. या मानसशास्त्राच्या शाखेत 'चांगले जीवन या जीवनातील महत्त्वाच्या मूल्यावर भर दिलेला आहे. प्रत्येक घटकाबाबत व्यक्तीचे विचार निर्माण होतात. काहीबाबत अधिक चांगले धनात्मक असतात तर काहीबाबत अधिक वाईट, ऋणात्मक असतात. ज्या घटकाबाबत व्यक्तीची धनात्मक वृत्ती असते अशा गोष्टी परत करण्यासाठी समोर येतो. आवडणारे शिक्षण असेल तर नक्कीच विद्यार्थी त्यास रस घेणार व चांगले ज्ञान घेवून यशस्वी होणार मात्र न रुचणारे विषय घ्यावे लागले तर नक्कीच त्याच विषयाकडे विद्यार्थी बघणारही नाही.
व्यक्तीमधील सकारात्मक विचार कोणते? त्यानी शरीर व मनावर कसा परिणाम होतो. सकारत्मकतेचा विचार कोणता? इत्यादीचा अभ्यास सकारात्मक मानसशास्त्रात केला जातो. या सकारात्मकतेतून व्यक्तीच्या जीवनात कशी यशस्वीता निर्माण होते. हे सकारात्मक मानसशास्त्रज्ञ उत्तम रीतीने समजून सांगू शकतात.
१४) अध्यात्मिक मानसशास्त्र (Spiritual Psychology)
बऱ्याचदा आपले आंतरिक मत आपल्याला काय करावे, काय करू नये असे सुचवित असते. म्हणजे व्यक्ती 'स्व'चे मत होते. त्यावेळी इतरांच्या मतांना दूर सारते. व्यक्तीला स्वतःच्या आंतरीक मतांवर ठाम विश्वास असतो. त्यावर इतरांनी बदल करायला लावल्यास व्यक्ती तो करीत नाही. अशा या आत्मीकतेचा व्यक्तीच्या शरीर व मनाशी कसा संबंध आहे? व्यक्तीच्या दैनंदिन बाबीवर कसा त्याचा परिणाम होतो? सुख व आत्मीक याचा संबंध कसा आहे? इत्यादीचा अभ्यास आत्मीक मानसशास्त्रात केला जातो.
आत्मा आणि मत हे कशाप्रकारे संबंधित आहे. याला वैज्ञानिक आधार आहे काय? जीवनात कसा याचा उपयोग करता येईल ? इत्यादी प्रश्नांची सोडवणूक आत्मीक मानसशास्त्रज्ञ करीत असतात.
१५) स्त्री मानसशास्त्र (Woman Psychology)
स्त्री व पुरुष ही जीवन संसाराची चाके आहेत. त्यामुळे पुरुषाप्रमाणे स्त्रीमध्ये सुद्धा कोणत्या बाबी अंतर्भूत होतात. त्यांचे आंतरीक बाह्य शारीरिक बदल कसे होतात? त्याच्या शरीरामधील संप्रेरकाचा त्याच्या मानसिकतेवर कसा परिणाम होतो? स्त्री व पुरुष याच्यामधील प्रकर्षाने सांगता येणारा भेद कोणता? स्त्रीमधील आदर्श गुण कोणते? तसेच त्यांची महत्तमता कोणती? इत्यादी सर्वांगीक गोष्टीचा अभ्यास स्त्री मानसशास्त्रात केला जातो.
स्त्रीच्या शरीरात पुरुषाच्या मानाने विविध टप्प्यावर बदल सभवीत असतात त्यामुळे त्यांच्यात कोणत्या समस्या निर्माण होतात व अशा परिस्थितीत स्त्रीने आपले मानसिक स्थैर्य राखण्यासाठी कार्य करावे याबाबतचा उपाय स्त्री मानसशास्त्रज्ञ सांगत असतात. आजस्थितीत स्त्री विषयक मानसशास्त्रात विविधांगी बाजूचा अभ्यास करण्यास सुरूवात झाली आहे.
१६) बाल मानसशास्त्र (Child Psychology)
व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यामधील पायाभरणीचा काळ म्हणून बाल्यकालीन काळ समजला जातो. मुल आईच्या उदरात असतांना त्याला वेगळे वातावरण मिळत असते. मात्र मुलाने जन्म घेतल्यानंतर मुलाला वेगळ्या वातावरणाला समोर जावे लागते. या कालावधीत मुल टप्प्याटप्प्याने कसे वर्तन करते ? त्याचा शारीरिक व मानसिक विकास कसा घडून येतो ? त्याला भेडसावणाऱ्या समस्या कोणत्या? व त्यावर कोणते उपाय करावे? इत्यादीचा अभ्यास बाल मानसशास्त्रात केला जातो.
बाल्यावस्था मुलाच्या दृष्टीने सर्व ज्ञान घेण्याचा काळ असतो. या अवस्थेत मुलाला निकोप वातावरण कसे देता येईल? म्हणजेच मुलाची वाढ निकोपच व्होईल? या दृष्टीने बाल मानसशास्त्रज्ञ उपाययोजना सूचवीत असतात. आजस्थितीत बालकाच्या दृष्टीने बाल मानसशास्त्राचा अभ्यास करण्याची गरज आहे. अशाप्रकारे वरील विविध शाखा मानसशास्त्राच्या असून विद्यार्थी जीवनात आपला व्यवसाय वा नोकरीच्या दृष्टीने अधिक उपयोगी सिद्ध होवू शकतात.
Social Plugin