जुनाट विकारांना भावनिक प्रतिसाद

जुनाट विकारांना भावनिक प्रतिसाद
(Emotional Responses to Chronic Health Disorders)



जुनाट विकारांना / आजारांना रुग्ण खालील प्रकारचे भावनिक प्रतिसाद देतात .

1. अस्वीकार
2. चिंताग्रस्तता
3. खिन्नता / अवसादावस्था /औदासीन्य (Depression)

1. अस्वीकार :

समोर आलेल्या त्रासदायक परिस्थितीची जाणीव झाल्यावर तिला नाकारणे ही। व्यक्तीने दिलेली अतिशय स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. डॉ. सिग्मंड फ्रॉइड यानी दिलेल्या संरक्षण यंत्रणेचा तो एक प्रकार आहे. ज्यामुळे आपल्याला त्रासदायक परिस्थितीशी जुळवून घेण्यास वेळ मिळतो. उदा., जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या मुलाच्या शिक्षकाने सांगितले की तुमचा मुलगा कॉलेजमध्ये येत नाही, तेव्हा त्या वडिलांची, 'छे, असे शक्यच नाही' अशी प्रतिक्क्रिया असू शकते. कारण असे न केल्यावर समोर आलेली वस्तुस्थिती लगेच मान्य केल्याने उत्पन्न होणारी चिंता हाताळणे जरा जड जाते. तसेच जर एखाद्याला गंभीर आजार झाला आहे असे निदान झाले तर, 'असे कसे शक्य आहे, प्रयोगशाळेकडून चूक झाली असेल. गेल्या महिन्यात तर तपासण्या केल्या होत्या तेव्हा सगळे रिपोर्ट्स चांगले होते' इत्यादी पद्धतीने आपण प्रतिक्रिया देत असतो. अशी प्रतिक्रिया आपल्याला जो धक्का बसला आहे त्याचा सामना करण्यास मदत करते.
आपल्या आयुष्यात काहीतरी चुकीचे घडते आहे हे कबूल करण्यास नकार देणे हा त्या वेळी तयार होणारा तणाव, वेदनादायक विचार, धोक्याची जाणीव आणि चिंता यांचा सामना करण्याचा मार्ग आहे. त्यामुळे आहे ते वास्तव न स्वीकारल्याने भावनात्मक संघर्ष हाताळायला वेळ मिळतो.

अर्थात हे समजणे महत्त्वाचे आहे की त्या वेळी वस्तुस्थिती तत्काळ नाकारणे ही प्रतिक्षिप्त क्रिया असते. परंतु जेव्हा हा नकार वाजवीपेक्षा जास्त वेळ असतो तेव्हा मात्र व्यक्ती जाणीवपूर्वक वस्तुस्थितीचा सामना करण्यास नकार देत आहे असे म्हणजेच 'नकार' ही चिंतेचा सामना करणारी संरक्षण यंत्रणा आहे. असे असले तरी कायम वाटू नकारात राहिल्यास उपचारांमध्ये किंवा आव्हानांचा सामना करण्याच्या आपल्या क्षमतेत अडथळा येऊ शकतो. शकते.

आरोग्य मानसशास्त्रज्ञ या परिस्थितीत जुनाट आजाराचे निदान झाल्यावर रुग्णाल वेळ देऊन, त्यांच्याशी आजाराविषयी काय करता येऊ शकेल जेणेकरून परिस्थिती अजून गंभीर होणार नाही याबद्दल बोलून त्यांची काळजी कमी करू शकतो.

2. चिंताग्रस्तता (anxiety) :


चिंता ही मानवी भावनांची एक मूलभूत बाजू आहे. संभाव्य धोक्याची जाणीव झाल्यावर त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा तो एक मानसशास्त्रीय तसेच शारिरीक वैशिष्ट्यांसह केलेला प्रयत्न आहे. 
अल्पावधीची चिंता ही एक प्रेरक असू शकते कारण एखाद्या संकटाचा सामना करण्यासाठी ती आपल्याला तयार करते. परंतु जेव्हा चिंता कायम राहते किंवा असामान्यपणे उद्भवते, सामाजिक, मानसशास्त्रीय किंवा शारीरिक आवश्यकतांपेक्षा जास्त असते तेव्हा ही चिंता विकृती होऊ शकते. ज्यामुळे मानसिक त्रास होऊ शकतो. जुनाट आजारामुळे निर्माण झालेली चिंता जर वास्तविक असेल तर ती प्रेरक असेल, म्हणजे त्या आजारासोबत सामना करायला उत्तेजन देईल. परंतु वाजवीपेक्षा अधिक वेळ आणि जास्त चिंता असेल तर ती अडथळा ठरेल.

जुनाट अथवा गंभीर आजाराचे निदान झाल्यावर चिंता होणे अत्यंत स्वाभाविक आहे. कारण त्यानंतर उर्वरित आयुष्य कसे पार पडणार याबद्दलचे भविष्य अचानक अंधूक होते. उलट आजाराशी निगडित चिंता आणि जगण्याची अशाश्वती अधिक स्पष्ट होते.

आजार आहे असा अहवाल आल्यानंतर चिंतेचे स्वरूप बदलते, पण चिंता असतेच. याचा परिणाम उपचाराच्या प्रतिसादावरसुद्धा पडतो.


3. खिन्नता / अवसादावस्था / औदासीन्य (Depression) :


औदासीन्याचे मानसशास्त्रात कधी-कधी सामान्य सर्दी म्हणून वर्णन केले जाते. याचा अर्थ औदासीन्य असणे हे बऱ्याच जणांमध्ये दिसते. पण जेव्हा जुनाट आजारामुळे रुग्णाला आयुष्यातला अर्थ संपला आहे असे वाटते तेव्हा औदासीन्याची तीव्रता किती जास्त असू शकेल याचा तुम्ही विचार करू शकता.

जुनाट शारीरिक आजाराचे निदान झाल्यानंतर व्यक्ती उदास राहणे, भूक न लागणे, वजन कमी होणे, झोप न येणे, थकवा वाटणे, सामाजिक समारंभ टाळावेसे वाटणे, खूप राग येणे आणि नैराश्यपूर्ण बोलणे इत्यादी लक्षणे प्रतिक्रिया म्हणून दिसू शकतात.

कोणत्याही जुनाट आजाराची स्थिती औदासीन्यास कारणीभूत ठरू शकते, परंतु आजार अधिक गंभीर असल्यास आणि जर त्या आजाराने रुग्णाच्या जीवनात खूप जास्त बदल होणार असल्यास औदासीन्याचा धोका अधिकच वाढतो.

अशा वेळेस रुग्णाला आहे त्या जुनाट आजाराचा आणि बरोबरीने औदासीन्याचापण त्रास सहन करावा लागतो. म्हणजे जुनाट आजार औदासीन्य वाढवतो आणि औदासीन्याने जुनाट आजाराची तीव्रता वाढते. यामुळे जणू दुष्टचक्रच तयार होते.

एखाद्या जुनाट आजारासोबत औदासीन्य ही स्थिती बऱ्याच वेळा दिसते, विशेषतः ज्या आजारात खूप वेदना होत असतील, प्रचंड थकवा येत असेल किंवा इतरांसोबत मिसळण्यास, संवाद साधण्यास मर्यादा येत असतील तर औदासीन्य अधिक तीव्र होत जाते. दुष्टचक्राप्रमाणे आहे त्या आजारातल्या वेदना तसेच थकवा औदासीन्यामुळे वाढत जातो. याच्या एकत्रित परिणामामुळे रुग्ण एकटं राहण्याचा प्रयत्न करतो. परिणामी, जुनाट आजार सुधारण्यासाठी केलेल्या औषधोपचारांना अपेक्षित प्रतिसाद न मिळण्याची शक्यता असते.

पण जुनाट विकारांच्या उपचारासोबतच रुग्णाला जर औदासीन्याचे देखील उपचार दिले गेले तर त्याच्या संपूर्ण वैद्यकीय स्थितीत बऱ्याचदा सुधारणा होते. तुलनेने आयुष्य अधिक सुलभ होते, ज्याचा परिणाम जुनाट विकारांची उपचार योजना जास्त चांगल्या पद्धतीने राबविण्यात होते.