जुनाट विकारांमधील वैयक्तिक मुद्दे (Personal Issues in Chronic Health Disorders)
एखादी व्यक्ती त्याला असलेल्या जुनाट विकारांसोबत / आजारांसोबत कशी लढते हे जर पूर्णपणे समजून घ्यायचे असेल तर त्या व्यक्तीच्या मानसिकतेचा विचार करावा लागेल. त्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती कशी आहे, तो ताणाला लवकर बळी पडतो का आदी बाबींचा विचार करावा लागेल. त्यामुळे मानसशास्त्रामधील 'स्व' ही संकल्पना अनेक अंगांनी समजावून घ्यावी लागेल.
'स्व' म्हणजे आपण कोण आहोत याबद्दलचे स्वतःचे ज्ञान, आपण आपल्या शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक पैलूंविषयी काय विचार करतो त्यावर आपली 'स्व' - संकल्पना ठरते. स्व-संकल्पना किंवा स्व-प्रतिमा जर सकारात्मक असेल तर स्व आदरसुद्धा जास्त असतो. परंतु संशोधनांतून असे समजते की दीर्घकाळ चालणाऱ्या आजारपणामुळे स्व-प्रतिमा, स्व-आवर यात कमालीचा फरक पडतो. कधी-कधी काही आजारांमध्ये व्यक्तीचे हळूहळू मानसिक खच्चीकरणसुद्धा होते.
प्रत्येक व्यक्तीच्या 'स्व' लादेखील अनेक पदर आहेत. त्यात
शारीरिक 'स्व',
साध्य 'स्व',
सामाजिक 'स्व' तसेच
वैयक्तिक 'स्व'
यांचा समावेश होतो. ते पुढीप्रमाणे
1. शारीरिक 'स्व' (The Physical Self) :
पहिली छाप ही शेवटची छाप असते असे म्हटले जाते. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला भेटतो तेव्हा प्रथमदर्शनी नजरेत भरते ते शारीरिक व्यक्तिमत्त्व. कोणाचे वर्णन करतानासुद्धा आपण बरेचदा उंच, बुटका, काळा, गोरा, सुंदर अशी विशेषणे वापरून करतो. त्यामुळे प्रत्येकाला आपले शारीरिक व्यक्तिमत्त्व प्रभावी असावे असे वाटते.
परंतु काही जुनाट विकारांमध्ये तसेच काही उपचारांमध्ये जेव्हा शरीरामध्ये नकोसे असणारे बदल होतात तेव्हा त्याचा परिणाम चिंता किंवा औदासीन्य / अवसादामध्ये होऊ शकतो. जरी कोणतेही आजारपण आपल्या जीवनावर परिणाम करत असले तरी बरेचदा गंभीर आणि दीर्घ आजारपणाचा अनुभव लोकांच्या शारीरिक 'स्व' संकल्पनेवर नकारात्मक प्रभाव पाडतो. त्यांना वेदना, अस्वस्थता, चिंता यांच्याबरोबरीने 'स्व' आदर आणि 'स्व' प्रतिमा हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे वाटत असते.
विकारांसोबत होणारे शारीरिक बदल गंभीर असतात त्यामुळे त्या बदलांचे मानसिक परिणामसुद्धा तितकेच तीव्र असतात. जसे काही आजारांमध्ये झपाट्याने वजन कमी होणे अथवा वाढणे, हालचाली कमी होणे, शारीरिक दैनंदिन कार्ये करण्याचे नियंत्रण गमावणे, अपघाताने अथवा शस्त्रक्रियेने शरीरावर कायमस्वरूपाचे डाग / व्रण उमटणे, त्वचेमध्ये फरक पडणे, केसांचे गळणे, भाजल्याच्या खुणा किंवा निकामी झालेला अवयव काढून टाकल्याने शरीर विद्रूप दिसणे इत्यादी अनेक कारणांमध्ये आपले शरीर जसे आधी होते तसे राहत नाही. अशा वेळेस व्यक्तीच्या शारीरिक 'स्व' मध्ये लक्षणीय नकारात्मक बदल होतो.
आरोग्य मानसशास्त्रज्ञ रुग्णांच्या आयुष्यात कमालीचे बदल घडवून आणू शकतात. रुग्णाचे तसेच कुटुंबीयांचे समुपदेशन या निमित्ताने झाले तर रुग्णाची सकारात्मकता वाढून तो उपचारांना चांगला प्रतिसाद देऊ शकेल. जसजसा समाज अधिक स्वीकारत जाईल तसतसे गंभीर आणि तीव्र परिस्थितीत असलेले लोक सकारात्मक मनोवृत्तीचे आचरण करू शकतील.
2. साध्य 'स्व' (Achieving Self):
प्रत्येकाला आपण आयुष्यात काहीतरी भव्य करावे, नाव कमवावे असे वाटत असते. नोकरीत मिळणाऱ्या बढत्या, वाढणारे पगार यामुळे आपला 'स्व' सुखावत असतो. झोकून देऊन काम करणारे या पद्धतीने व्यस्त असण्यात आनंद मानतात. तर काही लोक एखादा छंद जोपासणे, गिर्यारोहण करणे, बागकाम करणे किंवा पाठीवर बॅग टाकून भटकंती करणे यात रमतात. असे करताना त्यांना मनापासून आनंद होत असतो.
परंतु जुनाट, गंभीर आजारांमुळे दुर्दैवाने बरेचदा आवडीच्या अशा गोष्टींना मुकावे लागते आणि अशी परिस्थिती उद्भवल्यावर आपल्या साध्य - 'स्व' ला हानी पोचते. अर्थातच त्याचा वाईट परिणाम 'स्व' आदरावर पडतो. उदा., संगीताचा आनंद घेणाऱ्या व्यक्तीला आजारपणामुळे बहिरेपण येणे, नोकरीत बढतीमुळे परदेशी जायचे असताना अपघातामुळे सक्तीच्या रजेवर जावे लागणे इत्यादी.
अर्थात जर आजारपणामुळे साध्य 'स्व' ला काही धोका उत्पन्न झाला नसेल तर त्या आजारपणाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले जाते आणि रुग्ण उपचाराला चांगला प्रतिसाद देतो. उदा., एखाद्या चित्रकाराला आजारामुळे आपले पाय गमवावे लागले असतील तर सर्जनाची निर्मिती करणारे हात शाबूत राहिले याचा त्याला आनंद होतो. म्हणजेच आजाराने शरीराची हानी झाली तरी त्याला आयुष्यात जे साध्य करावयाचे होते त्यात खंड पडणार नाही ही भावना त्याच्या साध्य 'स्व' ला सुखावते. परिणामी, 'स्व' आदरसुद्धा शाबूत राहू शकतो. मात्र आयुष्यात जे काही साध्य करावयाचे असेल त्यात बाधा आली तर व्यक्तीचा साध्य 'स्व' दुखावतो.
परंतु स्व-आवर, स्व-सामर्थ्य तसेच जीवनाकडे सकारात्मकतेने बघण्याची इच्छा यामुळे व्यक्ती उज्ज्वल भविष्याकडे बघते आणि आहे त्या परिस्थितीतसुद्धा जगण्याला अर्थ प्राप्त करून देते. अशी कितीतरी नावे आहेत ज्यांनी शारीरिक आजाराचा बाऊ न करता आहे ती परिस्थिती स्वीकारून खूप मोठी स्वप्ने पाहिली आणि ती पूर्ण करण्याचा ध्यास घेतला. उदाहरणादाखल श्रीमती दीपा मलिक यांचे नाव सांगता येईल. त्यांनी कमरेखाल संवेदनाहीन असलेल्या शरीराकडे बघून खचून न जाता, समोर आलेले आयुष्य आणख कसे सुंदर करता येईल याचा ध्यास घेतला. जिद्दीने आणि चिकाटीने सर्व प्रयत्न करत पॅरालिम्पिक (Paralympic) स्पर्धेत गोळाफेक या स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. दीप भारताच्या पहिल्या महिला पॅरालिम्पिक पदक विजेत्या ठरल्या आहेत.
3. सामाजिक 'स्व' (Social Self) :
माणूस जन्माला येतांना नाती घेऊनच जन्माला येतो. 'स्व' ची ओळखसुद्धा इतरांच्या संदर्भातून होत असते. म्हणजे आपली 'स्व' संकल्पना इतर लोकांच्या प्रतिक्रियांमुळे प्रभावित होत असते. समाजाचा चांगलाच प्रभाव आपल्यावर असतो. कुटुंबापासून सुरू झालेला आपला सामाजिक प्रवास मित्र - मैत्रिणी, शाळा, शेजारी, नातलग, सहकारी असा चालत असतो. त्यामुळे कुटुंब आणि मित्र यांचे आयुष्यात मोठे मूल्य असते.
जुनाट आजार असलेल्या व्यक्तीलासुद्धा कुटुंबाच्या आणि मित्रमंडळींच्या सहकार्याने आजाराबरोबर लढण्याचे बळ मिळते. कुटुंब आणि मित्र यांच्यामुळे केवळ भावनिक मदत अथवा आर्थिक मदतच नव्हे तर विरंगुळ्यासाठीसुद्धा त्यांची मदत रुग्णाला मिळत असते. पण खूप जुनाट आजार असलेल्या व्यक्तींना आपल्याला कंटाळून हा गोतावळा सोडून तर जाणार नाही ना अशी नकळत भीती वाटत असते. वैद्यकीय क्षेत्रात आरोग्य मानसशास्त्राचा समावेश झाल्याने आरोग्य व्यवस्थापनात कौटुंबिक सहभाग व्यापक करण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले. आता कुटुंबीयांचे, रुग्णाची का जीळजी घेणाऱ्यांचे समुपदेशन करणे हा पण जुनाट आजार व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून समजल्या जातो.
4. व्यक्तिगत 'स्व' (Private Self) :
व्यक्तिगत 'स्व', याला खासगी 'स्व' असेही म्हणता येईल कारण प्रत्येक व्यक्तीजवळ त्याचे स्वतःचे असे काही असते ज्याची जागीय केवळ त्यालाच असते. त्यात त्याच्या अंतर्मनातील विचार, प्रेरणा, भावना, उद्दिष्ट, इच्छा, असे बरेच काही असते. ते कदाचित त्याच्या सार्वजनिक 'स्य' पेक्षा वेगळे असू शकते किंवा त्यात समानताही असू शकते.
जुनाट आजार असलेल्या रुग्णाच्या मनाच्या गाभ्यात काय आहे त्याचा परिणाम तो त्याच्या आजाराकडे कसा पाहतो यावर होतो. जर आजार जास्त गंभीर असेल किंवा फार जुनाट झाला असेल तर ज्याला हे कळून चुकलेले असते की त्याची जी स्वप्न होती, इच्छा-आकांशा प्रत्यक्षात येण्याच्या शक्यता संपुष्टात येणारी आहेत. उदा., कोणाला परदेशवारी करायची इच्छा असते, कोणाला आपल्या मुलाचे लग्न पाहावयाचे असते तर कोणाला स्वतःचे घर-गाडी घ्यायची असते. पण आजारपण या साऱ्या स्वप्नांना पुसट अशा वेळी आरोग्य मानसशास्त्रज्ञांच्या सहकार्याने रुग्णासोबत अशा राहिलेल्य इच्छांबद्दल चर्चा करून भविष्यातील नवीन महत्त्वाकांक्षा, उद्दिष्टे आणि योजनांबाबत त्याल बोलते करण्याचा प्रयत्न केला तर आशावाद वाढून जीवनाकडे सकारात्मक नजरेने पाहण्याची शक्यता वाढू शकेल आणि निश्चितच याचा परिणाम उपचारांना चांगला प्रतिसाद देण्यात होऊ शकेल.
Social Plugin