उद्योग आणि शिक्षण संस्था यांचा परस्पर संबंध

उद्योग आणि शिक्षण संस्था यांचा परस्पर संबंध (Application - Industry - Academia Connect)


विविध प्रकारच्या पारंपरिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांद्वारे शिकविले जाणारे ज्ञान आणि दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपयोगात आणावे लागणारे ज्ञान यांच्यात पडत आलेली दरी हा आधुनिक काळातील औद्योगिक मानसशास्त्रज्ञांच्या दृष्टीने नवीन मुद्दा नाही. तथापि, हे अंतर कमी करण्यासाठी मागील काही दशकांमध्ये विशेषतः मागील पाच वर्षांमध्ये संशोधकांचे लक्ष केंद्रित झालेले दिसते; कारण या कालावधित काही संशोधकांनी प्रकाशित केलेल्या संशोधन निबंधांमधून शिक्षण, संशोधन, वैद्यकीय व्यावसायिक आणि औषधांची निर्मिती करणारे कारखाने इत्यादी विविध प्रकारच्या, महत्त्वाच्या परस्पर संबंधांवर प्रकाश टाकलेला दिसतो. त्यामध्ये शाळा-महाविद्यालये, संशोधन संस्था आणि प्रयोगशाळांमध्ये शिकविल्या जाणाऱ्या ज्ञानाचा संबंध प्रत्यक्ष कार्याशी वा औद्योगिक उत्पादन प्रक्रियेशी जोडण्यावर लक्ष केंद्रित केले जाते; त्या दृष्टीने या क्षेत्रात काम करणारे मानसशास्त्रज्ञ हा संबंध कसा विकसित होईल, त्यावर प्रभाव टाकाणारी मूलभूत क्षेत्रे कोणती आहेत, वर्तमानकालीन परिस्थितीसाठी व भविष्याच्यादृष्टीने त्याचा काय उपयोग होईल इत्यादी प्रश्नांचा अभ्यास करत आहेत व त्यामुळे आता क्रमिक अभ्यासक्रम आणि औद्योगिक गरजा यांच्यातील परस्पर संबंध अधिकाधिक दृढ आणि वृद्धिंगत होत असलेला दिसतो. परिणामी आता शैक्षणिक संशोधनाला व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे.


थोडक्यात, उद्योजकांचे अर्थसाहाय्य आणि संशोधकांचे ज्ञान यांच्या परस्परपूरक संबंधाचा औद्योगिकीकरणावर प्रभाव पडत असलेला दिसतो.