औद्यौगिक / संघटनात्मक मानसशास्त्राची वर्तमान स्थिती :

औद्यौगिक / संघटनात्मक मानसशास्त्राची वर्तमान स्थिती :


औद्योगिक संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करतात. त्यांच्या कार्याचे प्रमुख चार विभाग दिसून येतात.

१. शैक्षणिक संस्था 

२. व्यापार आणि औद्योगिक संघटना 

३. सरकारी संस्था

४. बाह्य सल्लागार संस्था


१. शैक्षणिक संस्था 

महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील औद्योगिक व संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ मानसशास्त्र विभागात आणि व्यापारी शाळांमधून कार्यरत असतात. ते अध्यापन करतात, संशोधन करतात आणि विद्यापीठ व्यवस्थापनातही सहभागी होतात. शैक्षणिक संस्थेप्रमाणे त्यांच्या प्रत्यक्ष कार्याच्या तपशिलात बदल होतात. 

उदा. जे संशोधनाभिमुख संस्थेत, विद्यापीठात कार्य करतात ते इतर कोणत्याही कार्यापेक्षा, संशोधनात अधिक सहभागी होतात. जे अध्यापनाभिमुख संस्थेत कार्य करतात, त्यांचा अध्यापनावर अधिक भर असतो. या त्यांच्या प्राथमिक कार्याशिवाय बरेचजण स्वतंत्र सल्लागाराचे कार्यही करतात. हॉवर्डला (१९९०) असे दिसून आले, की १/३ पेक्षा अधिक शैक्षणिक क्षेत्रातील मानसशास्त्रज्ञ हे अध्यापनाबरोबरच समुपदेशक म्हणूनही कार्य करतात.


२. व्यापार आणि औद्योगिक संघटना :

व्यापारी व सरकारी संघटनांमध्ये, औद्योगिक संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ हे कर्मचारी म्हणून नेमले जातात.  ते, कर्मचारी व्यवस्थापक, प्रशिक्षण संचालक, संघटनेतील संशोधन पर्यवेक्षक आणि मानवसंसाधन संचालक म्हणून कार्यरत असतात. हे सर्व तीन प्रकारची कार्ये करतात: 

संशोधन, व्यवस्थापन आणि अंतर्गत समुपदेशन.

त्यांचे संशोधन हे प्रात्यक्षिकच  (Practically)असते. त्यांनी केलेले संशोधन हे मुख्यतः मालकाच्या फायद्यासाठी केले जाते, ते प्रसिद्ध करण्यासाठी केले जात नाही. औद्योगिक क्षेत्रातील बहुतेक मानसशास्त्रज्ञ हे काही प्रमाणात पर्यवेक्षण करतात आणि काही प्रमाणात व्यवस्थापकीय कार्य करतात. औद्योगिक संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ, काम करत असलेल्या औद्योगिक संस्थेत मानव संसाधन समस्यांवर तज्ज्ञ म्हणून सल्ला देण्याचे काम करतात. 

३. सरकारी संस्था

संस्थांतर्गत सल्लागार हे कर्मचारी असतात. करारावर आलेले नसतात. त्यामुळे हे तज्ज्ञ दीर्घकाळासाठी एखादा प्रकल्प विकसित करू शकतात व राबवू शकतात. काही दोष निर्माण झाल्यास तो सुधारण्यासाठी ते उपस्थित असतात (Kissler, 1985), या उलट, संस्थाबाह्य सल्लागार हा येतो, सल्ला देतो व निघून जातो. 


४. बाह्य सल्लागार संस्था

बाह्य सल्लागार म्हणून काम करणारे औद्योगिक/संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ हे, स्वयंरोजगारासाठी किंवा सल्ला देणाऱ्या फर्मसाठी काम करतात. एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे, सल्लागाराचा व्यवसाय करणाऱ्या एकूण सल्लागारांपैकी 3/4 सल्लागार हे सल्लागार संस्थेसाठी काम करतात. त्यांचा करार हा व्यावसायिक किंवा सरकारी संघटनांशी असतो. बाहेरचे सल्लागार हे त्यांच्या ज्ञानाचा व कौशल्याचा उपयोग संघटनेतील मानवीसमस्या सोडवण्यासाठी करतात. बाहेरचे सल्लागार हे संस्थांतर्गत मानसशास्त्रज्ञासारखीच सेवा उपलब्ध करून देतात.

उदा. एका सल्लागाराच्या मते ह्या कार्यात पुढील गोष्टी अंर्तभूत आहेत - कार्य विश्लेषण आणि कर्मचारी निवड, प्रशिक्षणाची रचना करणे, निष्पादन मूल्यांकन कार्यक्रम राबवणे, भरपाई रचनेचा विकास करणे, आरोग्य आणि संरक्षण मूल्यमापन करणे