प्रेरणा म्हणजे काय? मास्लोची प्रेरणा वर्चस्व श्रेणी स्पष्ट करा?
जे. पी. गिलफोर्ड यांच्या मते, "कोणत्याही क्रियेला प्रारंभ करून देणारी किंवा ती क्रिया चालू ठेवण्यास प्रवृत्त करणारी आंतरीक प्रचोदक शक्ती म्हणजे प्रेरणा होय.
मॅस्लोची प्रेरणा वर्चस्व श्रेणी (Maslow's Hierarchy of Motives)
प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रेरणा निर्माण होतात व त्या अनुरूप व्यक्तीकडून तसे कार्य घडण्यास मदत मिळते. व्यक्ती जन्मापासून तर मृत्यूपर्यंतच्या काळात व्यक्तीच्या प्रेरणा ह्या नियमित बदलत असतात का? याचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्न मॅस्लो यांनी केलेला आहे. व्यक्तीमध्ये निर्माण होणाऱ्या विविध प्रेरणांच्या श्रृंखलेला 'मॅस्लो यांची प्रेरणेची वर्चस्व श्रेणी' या नावाने ओळखले जाते.
मॅस्लो यांच्या वर्चस्व श्रेणीची रचना आकृतीत दिसून येते. आकृतीचे निरीक्षण केले असता खालून वरपर्यंत प्रेरणा असलेल्या दिसून येतात. त्यांची क्रमाक्रमाने सविस्तर माहिती घेवू या.
१) शारीरिक प्रेरणा (Biological motives/needs) :
यालाच 'जैविक प्रेरणा' असेसुद्धा म्हणतात. शारीरिक प्रेरणा ह्या व्यक्तीच्या अतिशय महत्वाच्या प्रेरणा आहे. व्यक्तीला जीवंत ठेवण्यासाठी या प्रेरणा किंवा गरजा पूर्ण होणे अतिशय महत्वाचे आहेत; यात भूक, तहान, निद्रा, लैंगिकता, श्वसन इ. गरजा येतात. ह्या गरजा नियमित पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करीत असतो. सर्वात प्राथमिकता किंवा अनुक्रम या शारीरिक प्रेरणा पूर्ण करण्याकडे असतो. कारण याने शरीर जीवत राहते त्यामुळे इतर प्रेरणा पूर्ण करण्याचा व्यक्ती विचार करू शकतो. ही गरज पूर्ण झाली तर समोरची गरज निर्माण होते.
२) सुरक्षिततेची प्रेरणा (Safety needs) : प्राथमिक प्रेरणा पूर्ण झाली की व्यक्ती दुसऱ्या प्रेरणा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो याला सुरक्षिततेची प्रेरणा असे म्हणतात. प्राथमिक गरजा पूर्ण झाल्या तरच व्यक्ती या दुसऱ्या क्रमांकाच्या प्रेरणेकडे वळू शकतो. अजूनही काही जमातीचे आयुष्य हे पोटाची खळगी भरण्यातच जात आहे त्यामुळे त्यांच्यात ही प्रेरणा निर्माण होत नाही. अन्नाची गरज संपली की, घरदार, मोटारकार, प्रवास इ. गोष्टी करण्याकडे व्यक्तीचा कल दिसतो. आपण आता व्यवस्थित सुरक्षित असावे असे व्यक्तीला वाटत असते. इतर व्यक्तींपासून धोका पोहचू नये असे व्यक्तीला वाटत असल्याने सुरक्षिततेची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न व्यक्ती करतो.
३) प्रेम व तद्भावनेची प्रेरणा (Love and Belonging nest ) :
व्यक्तीची सुरक्षिततेची गरज पूर्ण झाली की व्यक्ती समोरील प्रेरणेकडे वळतो ती म्हणजे प्रेम व तद्भावनेची प्रेरणा होय. व्यक्तीचे घरदार, बंगला झाला, व्यक्ती व्यवस्थित सुरक्षित राहायला लागल्यास व्यक्तीला इतर व्यक्तींकडून प्रेम, सहानुभूती, आपुलकी मिळावी असे वाटत असते. म्हणून व्यक्ती मित्र जपविण्याचा प्रयत्न करतो. मैत्री निर्माण करतो, शेजाऱ्याशी नाते जोडतो, लग्न करतो, कुटुंब तयार करतो, अनेक सेवाभावी संस्थेत कार्य करतो, अनेक संघटनांचे सदस्यत्व स्विकारतो अशा अनेक कार्यातून व्यक्ती ह्या प्रेम व तदभावनेची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.
४) स्व-आदरभावाची प्रेरणा (Self esteem needs):
प्रेम व तद्भावनेची प्रेरणा पूर्ण झाल्यानंतर चौथ्या क्रमांकाची प्रेरणा निर्माण होते याला स्व-आदरभावाची प्रेरणा असे म्हणतात. कौटुंबिक प्रेम, मित्राशी नाते प्रस्थापित झाल्यानंतर व्यक्तीला समाजात मान मिळावा, व्यक्तीला योग्य नावारूपाने, प्रतीक म्हणून ओळखावे, समाजाची सन्मानाची व आदराची भावना व्यक्तीप्रती प्रेषीत करावी अशी भावना व्यक्तीमध्ये जागृत होते. आपल्याला मान देईल, आपला सन्मान करेल वा करावा अशीच अपेक्षा यातून प्रतीत होते. विशेष व्यक्ती म्हणून व्यक्तीला ओळखल्या जावे असाच अट्टाहास व्यक्तीचा असतो. अशा गरजा पूर्ण झाल्यास व्यक्तीची समाजाबद्दलची भावना ही अतिशय चांगली निर्माण होते व व्यक्तीचा आत्मविश्वास वाढण्यास मदत मिळते.
५) आत्मवास्तविकीकरणाची प्रेरणा (Self actualization):
व्यक्तीला समाजात आदर व प्रतिष्ठा मिळाल्यास समोरील व पाचव्या क्रमांकाची प्रेरणा निर्माण होते त्यास आत्मवास्तविकीकरणाची प्रेरणा असे म्हणतात. एक गरज पूर्ण झाली की समोरच्या एक-एक गरजा पूर्ण करण्याकडे व्यक्ती वळत असतो. काहींची पहिलीच गरज पूर्ण होत नाही त्यामुळे ते इतर समोरच्या गरजेकडे वळूच शकत नाही. यामध्ये व्यक्ती स्वतःमधील सुप्त गुणांचा विचार करतो. आपल्या इच्छा पूर्ण झाल्या का? हा प्रश्न मनोमन विचारतो. जे ठरविले होते ते पूर्ण झाले का? याचा विचार करतो. आपल्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत, असे व्यक्तीला मनोमन वाटत असल्यास व्यक्तीची आत्मवास्तविकीकरणाची गरज सुद्धा पूर्ण झाल्याचे सुचित होते.
अशा या मॅस्लोच्या प्रेरणेचा वर्चस्व श्रेणी सिद्धांत पायऱ्या पायऱ्याने गरजा होतात हे सांगणारा आहे.
Social Plugin