ताण निर्माण होण्याची कारणे / स्रोत

ताण निर्माण होण्याची कारणे / स्रोत
(Sources of Stress)

ताण निर्माण होण्याची कारणे किंवा ताणाचे स्रोत वेगवेगळे असू शकतात. ते पुढीलप्रमाणे


1. व्यक्ती - अंतर्गत ताण किंवा व्यक्तीमुळे उत्पन्न होणारे ताणाचे स्रोत

(Sources within the Person)


(1) व्यक्तिमत्त्व (Personality): 

प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे असे वेगळे व्यक्तिमत्त्व असते. काही लोक मुळातच गंभीर असतात तर काही खिलाडू वृत्तीचे, काही भावनाप्रधान असतात तर काही खुशालचेंडू. काही व्यक्तींची प्रवृत्ती 'आज नहीं तो कल सही' असा प्रचार करणारी असते तर काहींना तसे करणे जमत नाही. त्यामुळे ताण येणे किंवा घेणे हे  त्या-त्या व्यक्तीवर अवलंबून असते.


(2) आयुष्यातील घटना (Life Events) : 

ताण हा नेहमीच पुढे काय होईल याच्या धास्तीने येतो. कारण जर वाईट किंवा न आवडणारे झाले तर ते वेळप्रसंगी आपल्याला कसे अमेल असे विचार तेव्हा असतात. त्यामुळे आहे त्या आरामदायी परिस्थितीतून (Comfort Zone) बाहेर पडताना पण ताण येतो. उदा., नव्या कॉलेजमध्ये पहिल्यांदाच जाणे, नोकरीवर रुजू होणे, घर बदलणे, लग्न करणे, पालकत्व स्वीकारणे इत्यादी अनेक.


(3) व्यक्ती-व्यक्तींमधील फरक (Individual Differences) : 

काही लोकांना ताण येण्यासाठी व्यक्तीचे आरोग्य, वय, शिक्षण, व्यवसाय, आर्थिक समस्या इत्यादी बाबी कारणीभूत असू शकतात. उदा. साधारणपणे जसजसे वय वाढते तसतसे जबाबदान्या वाढतात आणि ताणही वाढत जातो. तसेच तरुणपणी ज्या व्यक्ती वागण्यात- विचारात बिनधास्त असतात त्या म्हातारपणातही तसाच विचार करू शकतील याची शाश्वती नसते.


(4) दैनंदिन अडचणी /त्रास (Daily Hassles) : 

आपल्या रोजच्या दिनक्रमात पावलोपावली असे खूप प्रसंग येतात ज्याचा ताण येत असतो. अर्थात त्यातली बरीचशी कारणे तात्पुरती असतात आणि किरकोळदेखील असतात. उदा., वेळेवर गाडीच्या किल्ल्या न सापडणे, घाईच्या वेळी घरातला गॅस संपणे, सध्या 'वर्क फ्रॉम होम' या नव्या पद्धतीमध्ये घरातील इंटरनेट बंद पडणे, व्यक्ती घरातून काम करत असली तरी ती आभासी ऑफिसमध्ये असते त्या वेळी घरातल्या मुलांचा किंवा आवाजाचा त्रास होणे असे बरीच ताण उत्पन्न करणारी कारणे सगळे अनुभवत असतो.


(5) जीवनशैली (Life Style) : 

ताण निर्माण होण्यासाठी व्यक्तीची जीवनशैलीसुद्धा बरीचशी जबाबदार असते. उदा., उच्चभ्रू वस्तीत घर घेतल्यानंतर अवतीभोवती असलेल्या परिस्थितीनुसार खर्चीक राहणी ठेवावी लागल्यानेसुद्धा ताण येऊ शकतो. तसेच तुम्ही पाहिले असेल की एखाद्याचे मित्र नावाजलेल्या कंपनीचे कपडे किंवा वस्तू वापरत असतील तर, नकळत त्या व्यक्तीलासुद्धा तसे करण्याची इच्छा असते, पण कदाचित आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने आपण इतरांपेक्षा कमी आहोत अशी भावना वाढीस लागून त्याला ताण येतो.


2. कुटुंबातील स्रोत
(Sources in the Family

दुभंगलेले नाते व आर्थिक विवंचन :

 बरेचदा व्यक्ती स्वतः त्याच्या वैयक्तिक ताणाचा सामना सक्षमपणे करू शकतो, परंतु याच्या कुटुंबातून निर्माण होणारे ताण त्याला त्रासदायक ठरतात आणि विचलित करतात. उदा., दारू पिणारा मारझोड करणारा नवरा, सतत संशय घेणारी बायको, व्यसनाधीन झालेला मुलगा, भरमसाट खर्च करणारी मुले, लग्नासाठी सतत नकार देणारी मुलगी, वाढत्या महागाईत खर्चाचा न बसणारा मेळ आदी अनेक ताण देणारी कारणे कुटुंबात तयार झालेली असतात.


3. समुदाय आणि समाजातील स्रोत 
(Sources in the Community and Society)


ताण निर्माण होण्यासाठी व्यक्तीची जशी स्वतःची कारणे आहेत, कौटुंबिक कारणे आहेत त्याचप्रमाणे त्याचे कार्यक्षेत्र आणि समाज येथून देखील ताण निर्माण होऊ शकतो.


(1) नोकरीच्या ठिकाणचा ताण :

व्यक्तीच्या आयुष्यातला बराचसा काळ नोकरी व्यवसायात व्यतीत होतो. त्यामुळे तिथे असलेल्या ताणाचा परिणाम प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे व्यक्तीवर होत असतो. कामाचे वाढलेले तास, वाढत्या अपेक्षा मागण्या, सतत होणाऱ्या बदल्या, वरिष्ठांकडून मिळणारी वागणूक, बढती पगारवाढीमध्ये होत असलेला अन्याय, नोकरीची अनिश्चितता इत्यादी घटकांमुळे ताण निर्माण होतो. आहे त्याच नोकरीत नव्याने येणारा वरिष्ठदेखील ताणाचे कारण ठरू शकते


(2) सामाजिक घटकांमुळे येणारा ताण :

आताचे कोरोना महामारीचे सर्व जगावर आलेले संकट हे सामाजिक ताणाचे स्रोत म्हणून सांगता येईल. नंतर येणारी अर्थव्यवस्था मंदीच्या स्थितीत असू शकते, यामुळे राजकीय अस्वस्थता किंवा नोकरीच्या भविष्यासाठी अनिश्चितता मोठ्या प्रमाणात ताणाची परिस्थिती निर्माण करेल.


(3) तंत्रज्ञान बदल :

काही वर्षांपूर्वी जेव्हा सर्व कार्यालयांत हळूहळू कॉम्प्यूटरचा शिरकाव होत होता तेव्हा अनेक कर्मचाऱ्यांना त्याचा गतीने वापर करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे कामाची गती कमी होणे, कामात चुका होणे, वरिष्ठांची बोलणी खावी लागणे अशा गोष्टींनी लोकांना खूप ताण येत होता. त्याचप्रमाणे आतादेखील झपाट्याने तंत्रज्ञान बदलते आहे. त्या गतीने त्याच्याशी जुळवून घेणे अनेकांना शक्य होत नाही. त्याची निष्पत्ती ताणात होते.