ताणतणावाची लक्षणे अर्थात ताणाला दिले जाणारे प्रतिसाद

ताणतणावाची लक्षणे अर्थात ताणाला दिले जाणारे प्रतिसाद
(Responding to Stress)


ताणाला प्रतिसाद म्हणजे काय? खरे पाहता 'ताण येणे' हाच मुळी समोर आलेल्या परिस्थितीला दिलेला प्रतिसाद आहे. कधी हा प्रतिसाद शारीरिक असतो, कधी मानसिक / भावनिक तर कधी हा ताण प्रतिसाद वर्तन स्वरूपात दिल्या जातो. ज्या वेळी आपल्याला असे वाटते की उद्भवणान्या परिस्थितीशी सामना करण्यात आपण सक्षम नाही तेव्हा ताण येतो.

प्रत्येकाची पद्धत वेगळी असली तरी सर्वसाधारणपणे ताणाला प्रतिसाद पुढील तीन प्रकारे दिला जातो.


1. शारीरिक प्रतिसाद
(Physiological Response)

दीर्घकाळाचा ताण आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतो. दीर्घकालीन तणाव हृदय, प्रतिकारशक्ती ( Immune System), चयापचय कार्ये (Metabolism), अध्ययन, स्मृती आणि मेंदूवर कार्य करणारी हार्मोन्स यावर प्रभाव टाकतो. ताणाचा शरीरावर कसा परिणाम होतो हे समजण्यासाठी मेंदू आणि मज्जासंस्था यांची रचना थोडक्यात समजावून घेऊ.

मज्जासंस्थेचे केंद्रीय मज्जासंस्था (Central Nervous System) आणि सीमावर्ती मज्जासंस्था (Peripheral Nervous System) असे दोन भाग आहेत. केंद्रीय मज्जासंस्थेचा भाग म्हणजे मेंदू आणि मज्जारज्जू (Spinal Cord) तर सीमावर्ती मज्जासंस्थेचे स्वायत्त (Autonomus Nervous System) आणि कायिक मज्जासंस्था (Somatic Nervous System) असे उपभाग आहेत. ताणाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले दोन भाग म्हणजे सहानुकंपी मज्जासंस्था (Sympathetic Nervous System) आणि परानुकंपी मज्जासंस्था (Parasympathetic Nervous System) जे स्वायत्त संस्थेच्या अधिपत्याखाली येतात.

यातील स्वायत्त मज्जासंस्था (Autonomus Nervous System) शरीरांतर्गत येणाऱ्या ताणामध्ये प्रमुख भूमिका बजावते. केवळ ताण आणण्यामध्येच नव्हे तर शरीराला समजावून शांत करण्यातदेखील स्वायत्त मज्जासंस्था कारणीभूत असते. सहानुकंपी आणि परानुकंपी मज्जासंस्था या दोघांनी हे काम वाटून घेतले आहे. जेव्हा शरीरावर ताण येतो, तेव्हा सहानुकंपी मज्जासंस्था ज्याला 'लढा अथवा पळा' (Fight or Flight) प्रतिसाद म्हणून ओळखले जाते त्यामध्ये योगदान देते आणि आयुष्य धोक्यात येण्यापासून किंवा शत्रूपासून पळून जाण्यासाठी संपूर्ण शरीराला कामाला लावते. जेव्हा धोका आहे असे वाटते. तेव्हा एड्रेनलिन ग्रंथीला एड्रेनलिन (एपिनेफ्रिन) आणि कोर्टिसोल ही संप्रेरके रक्ताल सोडण्याचा संदेश देते. त्यानुसार ही सगळी संप्रेरके एकत्रितपणे काम करतात आणि हृदयाला वेगाने काम करायला लावतात. कारण त्या आणीबाणीच्या वेळी शरीराला योग्य रक्तपुरवठा होणे गरजेचे असते. (अर्थात आपण म्हणजे आपला मेंदू हुशार असल्याने शरीराच्या ज्या भागाला त्या वेळी त्वरित रक्तपुरवठा करणे गरजेचे आहे तिथे करतो आणि जिथे गरज नाही तिथे जसे त्वचा, तिथे रक्तपुरवठा कमी करतो. म्हणून भीतीच्या वेळी आपण पांढरे पडतो). शरीराला अधिक प्राणवायूची गरज असल्याने श्वसनदेखील अधिक वेगाने होऊ लागते. पचनसंस्थेचे काम मंदावते असे अनेक कितीतरी बदल त्या वेळी शरीरात वेगाने होतात. काही काळाने जेव्हा धोकादायक स्थिती दूर होते तेव्हा शरीराला जे काम घाईने करावे लागले होते त्याचा वेग कमी करून पुन्हा पूर्ववत आणण्याचे काम परानुकंपी मज्जासंस्था करते. म्हणजे आता तुमच्या लक्षात आले असेल की, कोणत्याही कारणाने का होईना जर आपण नेहमीच तणावग्रस्त राहिलो तर शरीराला किती त्रास होऊ शकतो. त्यामुळे साहजिकच ताण घेण्याचा परिणाम केवळ शरीरावरच नव्हे तर मनावर आणि वर्तनावरसुद्धा होतो.

म्हणजेच अल्प मुदतीचा तणाव आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो, पण जर आणीबाणीची परिस्थती संपल्यावरसुद्धा जर ताण जात नसेल आणि अल्प मुदतीसाठी होणारे शरीरांतर्गत बदल दीर्घकाळ तसेच राहत असतील तर मात्र आपल्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ लागेल तेव्हा चिडचिड, चिंता, औदासीन्य, डोकेदुखी, झोपेचे विकार आदी आपले अस्तित्व दाखवायला सुरुवात करतील.


2. मानसिक प्रतिसाद 
(Emotional Response)

ताण निर्माण करणारी काही ताणके पुढीलप्रमाणे आहेत- नातेसंबंध संघर्ष, नवीन किंवा वाढणाऱ्या कामाच्या जबाबदाऱ्या, दैनंदिन आयुष्यातील वाढत्या मागण्या, आर्थिक तंगी, प्रिय व्यक्तीचे निधन किंवा आजारपण, आरोग्य समस्या, नवे घर अथवा नवी नोकरी, अपघात इत्यादी.

तीव्र ताण लोकांमध्ये नैराश्य, चिंता आणि इतर मानसिक आजाराची शक्यता चांगलीच वाढविते हे मात्र सिद्ध झाले आहे. जर व्यक्तीचे बालपण खूप तणावग्रस्त गेले असेल जसे उपासमार, शारीरिक किंवा मानसिक छळ करणारे पालक लैंगिक शोषण इत्यादी तर त्या मुलांना नंतरच्या आयुष्यातही त्या ताणाचा परिणाम वेगळ्या प्रकारे दिसत राहतो. 

मुले किंवा पौगंडावस्थेतील मुलांना हिंसा, गैरवर्तन (लैंगिक छळ, शारीरिक किंवा भावनिक दुर्लक्ष) आणि पालकांची भांडणे, घटस्फोट इत्यादी तणावग्रस्त वातावरणात राहावे। लागले असेल तर त्याच्या मानसिक प्रतिसादामुळे त्या मुलांच्या आयुष्यात मोठेपणी इतरांशी जवळीक टाळणे, विचारांमध्ये नकारात्मकता येणे, त्याचे वैवाहिक जीवन सुलभ नसणे इत्यादी परिणाम दिसतात.

ताण ही त्या परिस्थितीला दिलेली प्रतिक्रिया असल्याने सारख्या घटनांचा सगळ्यांनाच सारखा ताण येईल असे नाही. परंतु प्रत्येकास काहीतरी मानसिक त्रास होतो, व्यक्तिपरत्व त्याची तीव्रता कमी-जास्त असते. ताणसदृश्य परिस्थितीत निराशा, असहाय्यता, औदासीन्य, चिंता, एकाकीपणाची भावना इत्यादी मानसिक क्लेश होतात.


ताणाचे वर्तनात्मक प्रतिसाद
(Behavioural Response to Stress)

ताणतणावाचे वर्तनावर होणारे परिणाम ताणाचा वेळ, कालावधी आणि तणावाच्य प्रकारावर अवलंबून असतात. ताणाचे व्यक्तीच्या वर्तनावर दिसून येणारे परिणाम इतरांवरह प्रभाव टाकत असतात. तणावग्रस्त असलेल्या व्यक्तीमध्ये कुटुंब आणि मित्रांचा संपर्क कर्म करणे, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत खराब संबंध असणे, लैंगिक इच्छा कमी असणे आवडीचे छंद जसे संगीत, कला किंवा वाचन यामधून रस कमी होणे, अस्वस्थपण हालचाली करणे, जेवणाची इच्छा कमी होणे, कामे करण्यात विलंब करणे, जबाबदाऱ्या टाळणे, नखे खाणे, दारू किंवा इतर व्यसनांचा जास्त वापर करणे, चिडचिड करणे, सतत झोपून राहणे, आनंद उपभोगता न येणे, सामाजिक कार्यक्रम टाळणे आणि आक्रमकता वाढणे इत्यादी लक्षणे दिसतात.

शारीरिक, मानसिक आणि वर्तनात्मक असे ताणाचे वेगवेगळे प्रकार दिसत असले तरी हे लक्षात ठेवले पाहिजे की हे तिन्ही प्रकार एकमेकांवर अवलंबून असतात आणि नेहमी एकमेकांच्या सोबत जाणवतात. उदा., जर एखाद्या गरजू व्यक्तीला नोकरी मिळत नसेल तर त्यामुळे त्याला ताण येऊन तो सतत उदास राहील, त्याला इतरांसोबत मिसळणे आवडणार नाही आणि त्या साऱ्यांचा परिणाम म्हणून त्याला एखादी शारीरिक व्याधी जडेल.