ताण - व्याख्या, स्वरूप आणि प्रकार
(Stress - Definitions, Nature Types) :
व्याख्या :
उद्दीपक परिस्थितीने व्यक्तीच्या क्षमतांना दिलेले आव्हान न पेलवणारे आहे असे व्यक्तीला जाणवल्यामुळे निर्माण होणारी दडपणाखाली मानस- शरीर अवस्था म्हणजे ताण होय.
ताण स्वरूप -
(Stress: Nature)
ताणाचे स्वरूप पाहण्यासाठी आपण काही वेगवेगळी उदाहरणे पाहू.
1. रमेशला चांगली नोकरी आहे, उत्तम पगार आहे. त्याने बरेच मोठे कर्ज घेऊन घर घेतले आहे. अचानक त्याचा अपघात झाल्याने त्याच्या उपचारासाठी खर्च करावा लागणार आहे तेव्हा कर्जाचे हफ्ते कसे देता येतील या विचाराने त्याला ताण आला आहे.
2. सुरेशची आज नोकरीसाठी एका कंपनीत मुलाखत आहे. तेथे जाण्यासाठी तो निघाला तेव्हा त्याची स्कूटर सुरू होत नसल्याने उशीर होईल म्हणून त्याला ताण आला आहे.
असे आणि यांसारखे कित्येक प्रसंग आपल्या जीवनात येत असतात. या सर्व उदाहरणांत त्या-त्या वेळची जी परिस्थिती आहे किंवा परिस्थितीची मागणी आहे त्याप्रमाणात व्यक्तीची क्षमता किंवा साधनांची उपलब्धता नाही.
ताण शारीरिक, मानसिक उत्तेजनात परिवर्तित होतो. तणावग्रस्त स्थितीला प्रतिसाद देताना शारीरिक समतोलत्व (Homeostasis) बदलते. अर्थातच, हे बदल म्हणजे तणावग्रस्त स्थिती सहन करण्यासाठी आपल्या मज्जासंस्थेने बचावासाठी उभी केलेली संरक्षण यंत्रणाच असते. परंतु जेव्हा व्यक्ती सहनशक्तीची कमाल पातळी ओलांडतो तेव्हा शारीरिक व मानसिक आरोग्यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो.
हॅन्स सेलये यांना ताणतणाव या विषयावरील संशोधनाचा जनक म्हटले जाते. त्याने सांगितले की, ताण नकारात्मक भावना असली तरी सर्वच ताण वाईट नसतात. उत्तम कामगिरीसाठी थोडा ताण असणे गरजेचे आहे.
आपले शरीर आजूबाजूला घडणाऱ्या घटनांना, संपर्कात येणाऱ्या उद्दीपकांचे जसे अर्थ लावले जातील त्याप्रमाणे प्रतिक्रिया देत असते. जेव्हा उद्दीपक सुखावह नसतो तेव्हा नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या जातात आणि अर्थातच ताण येतो. त्याचा प्रतिकूल परिणाम सरतेशेवटी व्यक्तीच्या शरीरावर होत जातो. बरेचदा शरीरावर सूक्ष्मपणे होत जाणाऱ्या या परिणामांची कल्पना व्यक्तीला सुरुवातीला होत असतेच असे नाही. म्हणूनच अत्यंत जबाबदारीच्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तीला अनेक दिवस तणावग्रस्त घटना हाताळल्यामुळे वाढणारा रक्तदाब लगेच जाणवत नाही तर त्याचे प्रमाण बरेच वाढल्यावर कधीतरी अचानक जाणवते.
या संपूर्ण प्रक्रियेत प्रमुख तीन अवस्था मांडल्या.
1) सावधान अवस्था (Alarm Reaction Stage)
या अवस्थेमध्ये लढा अथवा पळा ही भूमिका असते. कॅनन यांनी (1932) भावनांच्या उगमाबद्दल केलेल्या अभ्यासात लढा किंवा पळा हा सिद्धान्त मांडला आहे. ते म्हणतात बाह्य धोके असताना व्यक्ती या दोनपैकी एक युक्ती अवलंबिते. या स्थितीला अचानक तोंड द्यावे लागल्याने मेंदूकडे काहीतरी धोका आहे असा संदेश पोचतो. त्यामुळे बचावासाठी मेंदू मज्जासंस्था कामाला लावते. त्यामुळे हृदयाचे ठोके वाढणे, तोंडाला कोरड सुटणे, तळहाता-पायाला घाम येणे, मळमळणे, डोके दुखणे, शरीराचे तापमान वाढणे, इत्यादी शारीरिक बदल दिसून येतात. अर्थातच ताण घेत राहण्याची वेळ जर खूप जास्त असेल किंवा अगदी क्षुल्लक गोष्टीतही व्यक्ती वारंवार ताण घेत असेल तर त्याचे दूरगामी परिणाम शरीरावर होणार हे निश्चित आहे.
(2) प्रतिरोध अवस्था (Resistance Stage) :
काहीकाळानंतर आपले शरीर या पुनर्प्राप्ती अवस्थेत (Recovery Phase) प्रवेश करत असले तरी, ते थोड्या काळासाठी उच्च सतर्कतेवर किंवा सावध अवस्थेत राहील. जर तुम्ही तणावावर मात केल्यास आणि ती परिस्थिती असेल तर आपल्या संप्रेरकाची पातळी, हृदय गती आणि रक्तदाब तणाव पूर्वावस्थेपर्यंत पोहोचेल आणि शारीरिक स्थिती पूर्ववत व्हायला सुरुवात होईल, परंतु जेव्हा ताणके बराच काळ असतात तेव्हा शरीर यंत्रणा त्याला तोंड द्यायला सज्ज होते. जमेल तसे त्या ताणाचा परिणाम कमी करण्याचा प्रयत्न करते. जर तुम्ही तणावाचे निराकरण केले नाही आणि तुमचे शरीर जास्त काळ उच्च सतर्कतेत (High Alert ) राहील, शेवटी नकळत उच्च तणावाच्या पातळीसह कसे जगायचे ते शिकेल परंतु हे करत असताना नकळत शरीराला कायम धोका आहे असेच वाटत राहील, अति ताणामुळे त्याचा परिणाम अपुरी झोप, चिडचिड, चिंता अशा लक्षणात रूपांतरित होतील.
3) क्लान्ति / थकवा अवस्था (Exhaustion Stage) :
ताणाचा प्रतिरोध करूनही जर ताण कमी होत नसेल म्हणजे ताणके दीर्घकाळासाठी असतील तर व्यक्ती मानसिकदृष्ट्या थकते. त्याचा परिणाम दैनंदिन जीवनावर होऊ लागतो आणि शरीरावर गंभीर परिणाम होऊ लागतात. औदासीन्य, चिंता, रक्तदाब आदी त्रास जडण्याची शक्यता वाढते.
ताणाचे प्रकार
(Types of Stress)
(1) सकारात्मक / विधायक ताण (Positive Stress) :
या प्रकारचा ताण हा हानिकारक नसतो. ज्या ताणाचे परिणाम सकारात्मक असतात तो ताण हवासा वाटतो. अशा ताणाला 'युस्ट्रेस' (Eustress) असे म्हणतात. या ताणामुळे व्यक्ती प्रेरित होऊन अधिक चांगल्या प्रकारे निर्णय घेऊ शकते. उदा., सगळ्यांसमोर स्टेजवर नाटक करते वेळी येणारा इष्टतम ताण व्यक्तीला चांगल्या कामगिरी करण्याकडे वळवू शकतो.
(2) नकारात्मक / विघातक ताण(Negative Stress) :
जेव्हा व्यक्तीला आहे त्या परिस्थितीमध्ये कसे जुळवून घ्यावे याचे कौशल्य नसल्याने ती व्यक्ती अति जास्त ताण घेते त्यामुळे निर्णय प्रक्रियेवर किंवा कामगिरीवर वाईट परिणाम होतो. अति ताण घेतल्याचे परिणाम नकोसे असतात. अशा नकारात्मक ताणाला डिस्ट्रेस (Distress) असे म्हणतात. अर्थात या ताणाचे परिणाम व्यक्तीच्या शारीरिक अथवा मानसिक हानीतच होते. उदा., सगळ्यांसमोर स्टेजवर नाटक करते वेळी येणारा अति ताण व्यक्तीला वेळेवर न आठवणे, पाय लटपटणे असे होऊन कामगिरी खराब करू शकतो. म्हणजेच युस्ट्रेस डिस्ट्रेसमध्ये कधी परावर्तित होईल हे सांगता येत नाही. सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच ताण घेणे योग्य असते. कारण त्यानंतर कामगिरीचा दर्जा खालावतो.
(३)सौम्य / तात्पुरता ताण (Hypo-stress) :
या प्रकारच्या ताणात सातत्याने कंटाळा व दडपण जाणवते. जुनाट / दीर्घकालीन ताण (Chronic Stress) हे hypo stress चे उदाहरण आहे. वर्षानुवर्षे एकाच प्रकारचे काम करणाऱ्या व्यक्तीला hypo stress चा अनुभव येतो. मला कंटाळा आला, नको आता तेच तेच काम अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्तीकडून येतात.
(4) उच्च / दीर्घकालीन ताण (Chronic Stress) :
हा ताण जेव्हा व्यक्तीवर एखादा आघात होतो किंवा ज्या घटनेचे दीर्घकालीन परिणाम होऊ शकतील अशा परिस्थितीत असतो तेव्हा येणारा ताणसुद्धा दीर्घकालीन असतो. जसे एखाद्याची शारीरिक छळवणूक - होणे, घरातल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होणे इत्यादी. उदा., दुर्दैवाने अपघातात रेल्वे रुळावर पडून पाय कापला गेल्याने येणारा ताण दीर्घकालीन असू शकतो.
याव्यतिरिक्त ताणाचे शारीरिक ताण, पर्यावरणीय ताण, मानसिक ताण आणि सामाजिक ताण या प्रकारे सुद्धा वर्गीकरण केल्या जाते.
(5) शारीरिक ताण :
हा ताण निर्माण होण्याची कारणे अर्थातच शारीरिक आरोग्याशी निगडित आहेत. हा ताण जेव्हा शरीराला दुखापत होते, पौष्टिक आहाराचा अभाव, पुरेशी झोप मिळत नाही तेव्हा उत्पन्न होतो.
(6) पर्यावरणीय ताण :
कधी-कधी आपल्याला वातावरणातील प्रदूषण, मे महिन्यात पडणारे कडक ऊन किंवा जुलै संपत आला तरी न आलेला पाऊससुद्धा ताण देऊ शकतो. अशा पर्यावरणीय ताणासोबत निसर्गाचा कोप होऊन आलेला प्रलय, भूकंप इत्यादींमुळेसुद्धा व्यक्तीला ताण येतो..
(7) मानसिक ताण :
या प्रकारचा ताण शक्यतो व्यक्ती स्वतः आपल्या मनात निर्माण करत असते, त्यामुळे याचा स्रोत अंतर्गत आहे असे म्हणावयास हरकत नाही. मनात चाललेला संघर्ष, निर्णयक्षमता नसल्याने उडणारा गोंधळ, समस्या कशा सोडवायच्या याचे नसणारे कौशल्य मानसिक ताणासाठी कारणीभूत असते. परिणामी, व्यक्ती नेहमी चिंता आणि काळजी करीत असते.
(8) सामाजिक ताण :
या ताणात अर्थातच त्या व्यक्तीशिवाय दुसरे कोणीतरी सहभागी असते. जसे आप्त, कुटुंबीय, शेजारी, मित्रमंडळ, सहकारी, जेव्हा व्यक्तीचे इतरांसोबतचे नातेसंबंध बिघडलेले असतात तेव्हा असा ताण निर्माण होतो. जेव्हा घरात मुलांचे पालकांसोबत पटत नाही किंवा पती-पत्नीमध्ये टोकाचे भांडण असते तेव्हा सामाजिक ताण तयार होतो.
Social Plugin