सकारात्मक भावना व खुशाली
(Positive Emotions and Well-Being)
सकारात्मक भावना व खुशालीचा जवळचा संबंध आहे. पुढील मुद्यावरून तो स्पष्ट होतो.
१. आनंदीवृत्ती आणि सकारात्मक वर्तन (Happiness and Positive Behaviour) :
सकारात्मक भावना असलेल्या व्यक्ती अधिक आनंदी, सुखी, समाधानी खुशाल असतात. ह्या व्यक्ति अधिक लवचिकपणे, सृजनशीलतेने आणि कणखरपणे आव्हानांना समोरे जातात (फ्रेडरिकसन २००१)
मेयर (Myer-1952) च्या मतानुसार आनंदी व्यक्ती अनेक सकारात्मक कृती करतांना दिसतात. दुसऱ्यांचा विचार करतात. याउलट नकारात्मक भावानंचे प्राबल्य असलेल्या व्यक्ती स्व-केंद्रित विचारात गुरफटलेल्या असतात आणि स्वतःच्याच सुख-दुःखांचा विचार करतांना दिसतात. आनंदी व्यक्ती जगाविषयीचा अधिक व्यापक विस्तारीत दृष्टिकोन बाळगतात. जगाकडे सकारात्मकदृष्टिने पाहतात.
२. सकारात्मक भावना आणि यशस्वीता (Positive emotions and success)
सर्वसाधारणः व्यापकदृष्टिने असे समजले जाते की, यश आले की व्यक्ती सुखी होते. म्हणजे यशस्वीता व्यक्तीला आनंद देते. पण अलिकडच्या संशोधनातून असे दिसून आले की व्यक्तिची आनंदीवृत्ती आणि सकारात्मक भावना हे यशस्वीतेचे परिणाम नव्हे तर यशस्वीतेचे कारण आहे. म्हणजे आनंदी व्यक्तींनाच निरनिराळ्या क्षेत्रात यश मिळते. आनंदी व्यक्तिच्या सर्व्हेक्षणानुसार आनंदी व्यक्ती ह्या वैवाहिक जीवनात, मैत्रीपूर्ण संबंधात, कामाच्या ठिकाणी, आर्थिक प्रगतीच्या बाबतीत आणि शारीरिक, मानसिक आरोग्यदृष्ट्या अधिक यशस्वी झालेल्या दिसतात. याचे कारण म्हणजे त्यांची आनंदीवृत्ती होय. म्हणून आनंदीवृत्ती सकारात्मक भावना आणि यशस्वीता यांचा जवळचा संबंध आहे.
३. सकारात्मक भावना आणि समृध्दजीवन (Positive Emotions and Flourishing)
फ्लॉरिशिंग म्हणजे व्यक्तिची सर्वोत्तम कार्य करण्याची स्थिती होय. फ्लॉरिशिंग सर्वोत्तम मानसिक आरोग्याचे धोतक समजले जाते. वैभवपूर्ण समृध्द जीवन म्हणजे फ्लॉरिशिंग. फ्लॉरिशिंगच्या विरूद्ध शब्द आहे तो Languishing मानसिक आरोग्य विघटित होऊन रिक्त पोकळ जीवन, जीवनातील अर्थशुन्यता, विषण्णता दर्शविणे. गलीतगात्र होणे म्हणजे Languishing .
सकारात्मक भावना प्रभावी असणाऱ्या व्यक्ती जीवनात अर्थ शोधतात. त्यांच्या जगण्यातही अर्थ असतो. एक प्रकारचा उत्साह, आनंद असतो. सकारात्मक भावनांमुळे व्यक्ति अधिक खुशाल दिसतात. त्यांचे कार्यनिर्वर्तनही उत्तम असते. या व्यक्ती कमीत कमी वेळेत उत्तम प्रकारचे कार्य करतात, भरभराट करतात. जीवन समृध्द करतात.
कोरे केयस (Corey Keyes) यांच्या मतानुसार स्व-स्विकार, व्यक्तिगत विकास, जीवनाचा हेतू शोधणे, जीवनाचा अर्थ शोधणे, परिस्थितीवर प्रभूत्त्व, स्वावलंबन, इतरांशी सौहार्दपूर्ण संबंध आणि सकारात्मक सामाजिक कार्य या घटकांचा उत्तम सकारात्मक आरोग्य जीवन जगण्यामध्ये समावेश होतो. फ्लॉरिशिंग गुणवत्ता असलेल्या व्यक्ती सर्वच क्षेत्रात उत्तम कार्य करतात.
Social Plugin