व्यक्तिमत्त्व विकासावर परिणाम करणारे घटक
अनुवंशिक / जैविक घटक
» शरीररचना
» अंतःस्राव ग्रंथी
»विविध क्षमता
परिस्थितीजन्य घटक
» भौगोलिक परिस्थिती
» कुटुंब
» शेजार व मित्र
» शाळा
» समाज
»प्रसार माध्यमे
» संस्कृती
अ) अनुवंशिक किंवा जैविक घटक
व्यक्ती-व्यक्तीच्या शरीरात, बुद्धीत व भावना विष्कारात जी भिन्नता आढळते. ती काही अंशी अनुवंशावर अवलंबून असते. शरीराचा रंग व ठेवण, बुद्धी इत्यादी गोष्टींचा ठेवा व्यक्तीला जन्मतःच मिळालेला असतो. व्यक्तीजवळ असलेल्या या उपजत बाबींना अनुवंशिक किंवा जैविक घटक म्हणतात. हे घटक एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असतात.
१. शरीररचना :
काही व्यक्तींना उंच, धिप्पाड तर काहींना बुटके शरीर लाभलेले असते. काही व्यक्तींचे शरीर सुडौल व व्यंगरहित असते तर काहींना शारीरिक व्यंगे असतात. व्यक्तीच्या शरीररचनेचा तिच्या समायोजनावर चांगला किंवा वाईट परिणाम होतो. उत्तम शरीरयष्टी व आकर्षक चेहरा असणाऱ्या व्यक्तींचा इतरांवर लवकर प्रभाव पडतो. बहिर- पण, मुकेपण, दृष्टीदोष किंवा अन्य शारीरिक व्यंग असणाऱ्या व्यक्ती समाजात नीट मिसळू शकत नाही.. शारीरिक दोषांचा व्यक्तीच्या भावनिक व सामाजिक विकासावर अनिष्ट परिणाम होतो.
२. अंतःस्राव ग्रंथी :
या ग्रंथी आकाराने लहान असतात. त्यांचे कार्य 'हार्मो न्स' ही जैव रासायनिक द्रव्ये तयार करण्याचे असते. ह्या ग्रंथीमधून निर्माण होणारे स्राव सरळ रक्तात सोडले जातात. म्हणून त्यांना विनाल ग्रंथी किंवा अंतःस्राव ग्रंथी असे म्हणतात. कोणत्याही एका ग्रंथीचे कार्य वाजवीपेक्षा कमी वा जास्त झाल्यास त्याचे परिणाम इतर ग्रंथीच्या कार्यावर होतात. दोन किंवा अधिक ग्रंथी मिळून एखाद्या कार्याचे नियंत्रण करतात. अंतःस्राव ग्रंथीतून होणाऱ्या स्रावाचे प्रमाण व त्यातील समतोल याचा व्यक्तीच्या वर्तनावर खूप परिणाम होतो. मस्तकपिंडातून होणारा स्राव प्रमाणापेक्षा जास्त झाल्यास शरीराची अतिरिक्त अनैसर्गिक वाढ होते. कंठपिंडातून जास्त स्राव होऊन ते रक्तात मिसळला तर वर्तनात अस्थिरता व चंचलता येते. हा स्राव कमी झाल्यास व्यक्ती सुस्त बनते. वृक्कस्थ पिंडातील स्रावामुळे भावनिक उद्रेकाच्या समयी शरीर व्यापारावर ताबा राहतो. जननग्रंथीतील स्राव कामवासना वाढवितात. म्हणून व्यक्ती विकासात ग्रंथींचा वाटा आहे.
३. विविध क्षमता :
बौद्धिक क्षमतेचा व्यक्तिविकासावर फार परिणाम होतो. बुद्धी सामर्थ्याने कोणतीही व्यक्ती इतरांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करू शकते. बुद्धीमत्ताबरोबर प्राप्त केलेल्या ज्ञानाचे प्रकटीकरण करण्याची क्षमता असणे आवश्यक असते. प्रत्येक व्यक्तीत निसर्गतः विविध क्षमता असतात. फक्त त्या क्षमता ओळखून त्यांचा विकास करता आला पाहिजे.
वरील सर्व घटक हे जैविक घटक आहेत किंवा अनुवंशिक घटक आहेत.
ब) परिस्थितीजन्य घटक
परिस्थितीजन्य घटक हे ज्या ठिकाणी, ज्या कुटुंबात आपला जन्म होतो. त्यानुसार आपल्याला उपलब्ध होत असतात. यात पुढील घटकांचा समावेश होतो.
१. भौगोलिक परिस्थिती :
भौगोलिक परिस्थितीनुसार व्यक्तिमत्त्वाला । विशिष्ट वळण लागते. डोंगर व जंगल असलेल्या प्रदेशातील लोक जास्त कष्टाळू व साहसी असतात. सुपीक मैदानी प्रदेशातील लोक जास्त धडपड न करणारे, संथ व ऐषारामाचे जीवन जगणारे असतात. महापूर, ज्वालामुखीचा उद्रेक, वादळ इत्यादींना तोंड द्यावे लागणाऱ्या भागातील लोक जास्त निधड्या छातीचे असतात. कोणतीही नैसर्गिक आपत्ती प्रकर्षाने येत नाही अशा भागात राहणारे लोक इतर भागातील लोकांच्या तुलनेत भित्रे असतात.
२. कुटुंब :
घर हेच प्रत्येक बालकाचा पहिला समाज असतो. बाल्यावस्थेपासून मूल घरातील वातावरणातच वाढत असते. या बालवयात मूल परावलंबी व अत्यंत अनुकरणशील असते. घरातील सर्व व्यक्तींच्या वर्तनाचा व सांस्कृतिक वातावरणाचा मुलाच्या वर्तनावर परिणाम होत असतो. कौटुंबिक समाजातच मुलाच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पडतात. त्याच्या वर्तनाचे काही घाट निश्चित होतात. मुलाच्या योग्य व्यक्तिमत्त्व विकासासाठी त्याची मातृप्रेमाची गरज योग्य त्या प्रमाणात लहानपणी भागविली जाणे आवश्यक असते. कुटुंब शहरी की ग्रामीण भागातील, श्रीमंत की गरीब कुटुंबातील निरनिराळ्या व्यक्तींचे परस्परसंबंध इ. गोष्टींचा परिणाम मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर होत असतो. ज्या बालकाला प्रेमळ, सद्वर्तनी, फाजील लाड न करणारे व अपत्याच्या योग्य विकासाची काळजी घेणारे आईवडील लाभतात. त्याचे व्यक्तिमत्त्व योग्य रितीने विकसित होते. कजाग आई, व्यसनी, बाहेरख्याली वडील नशिबी आलेल्या मुलांचे व्यक्तिमत्त्व लहानपणीच खुरटून जाते. घरात वडिलांचा आवश्यकतेपेक्षा जास्त दरारा असेल व मुलाला कुठलेही स्वातंत्र्य लाभत नसेल तर अशी मुले भित्री व कातर स्वभावाची होतात. आईवडिलांचा बालपणी सहवास न लाभलेली मुले धास्तावलेली व चिंताग्रस्त होतात तसेच निस्तेज, धास्तावलेली व अंतर्मुख बनतात. ज्या मुलांचा फाजील लाड होतो ती मुले लहरी स्वार्थी व हेकट स्वभावाची होतात. एकुलत्या एका मुलाला इतर मुलांचा सहवास न लाभल्यास त्याला अकाली प्रौढत्व येते.
३. शेजार व मित्र :
घराबाहेर खेळायला येऊ लागल्यानंतर मुले शेजारच्या समवयस्क मुलांबरोबर खेळू लागतात. या वयात क्रिडा व संघप्रवृत्ती फार प्रबल असतात. किशोरावस्थेतील मुलांना कुटुंबातील व्यक्तीपेक्षा समवयस्क मित्र जास्त प्रिय वाटू लागतात. या वयात संघनिष्ठा इतकी प्रबळ असते की त्यांच्या गटातील मुलांना इतर कुणीही त्रास दिल्याचे वा कमी लेखल्याचे त्यांना खपत नाही. या वयात मित्रांच्या वर्तनाचा व्यक्तिमत्त्व विकासावर खूप परिणाम होतो. चांगल्या मित्रांच्या सह- वासात असणाऱ्या मुलांचे व्यक्तिमत्त्वाचे चांगले पैलू पडत जातात तर वाईट मित्रांच्या संगतीत असणारे मुल दुर्वर्तनी होऊ लागते.
चांगल्या वाईट संगतीचा या वयात होणारा परिणाम पुष्कळ वेळा दुरगामी ठरतो. घराबाहेरील समाजात मुल जसजसे मिसळत जाते तसतसे ते इतरांसाठी जगण्यास शिकू लागते. पुढारी, अनुयायी हे संबंधही गटात निर्माण होतात. आपल्या गटात वठवाव्या लागणाऱ्या विविध भूमिकांमधून मुलाचे व्यक्तिमत्व घडत जाते.
४. शाळा :
शाळा हा छोटेखानी समाज असतो. वयाच्या सहाव्या वर्षी मुले प्राथमिक शाळेत जाऊ लागते. तत्पूर्वी काही मुले मॉन्टेसरी, बालवाडीसारख्या पूर्व प्राथमिक शाळांमधून आलेली असतात. शाळेत मुलाला खूप मोठा सामाजिक परिसर लाभतो. घरच्या वातावरणातून शाळेच्या वातावरणात आलेले मुल सुरुवातीला भांबावलेल्या स्थितीत असते. हळूहळू ते शालेय जीवनाशी समायोजन साधू लागते. शिक्षका व्यक्तिमत्त्व, विविध विषयांचा अभ्यास, परिपाठ, अभ्यासपूरक व सहशालेय उपक्रम, खेळ, क्रिडा, कवायती इत्यादींचा मुलाच्या वर्तनावर परिणाम होऊन त्याचे व्यक्तिमत्त्व घडू लागले. प्रेमळ कर्तव्यदक्ष शिक्षक आदर्श ठरतात. सुख, दुःख, यश, अपयश, मान, अपमान इत्यादी अनुभव प्रकर्षाने येऊ लागतात. या सर्व अनुभवांचा व्यक्तिमत्त्व विकासावर परिणाम होऊ लागतो. उत्तम शालेय वातावरण व आदर्श शिक्षक यांचा मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर निश्चितच चांगला परिणाम होतो.
५. समाज :
सुसंस्कृत समाजात वा घरात वाढणारी मुले व असंस्कृत समाजात वा घरात वाढणारी मुले यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात महत्त्वाचा फरक दिसून येतो. सुदृढ सामाजिक व सांस्कृतिक वा- तावरणाचा व्यक्तिमत्त्व विकासावर परिणाम होतो. त्याग, सहिष्णूता, सेवा यासारख्या मुल्यांची जोपासना करणाऱ्या समाजात वाढणाऱ्या मुलांमध्ये ही मुल्ये हळूहळू रुजत जाता. लोकशाही पद्धतीने जीवन जगणाऱ्या समाजात सहकार्याची भावना वाढीस लागते. ज्या समाजात मुल वापरते त्या समाजाच्या चालीरिती, विचार करण्याच्या पद्धती, श्रद्धा याचाही परिणाम मुलाच्या व्यक्तिमत्त्वावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे होतो. उदा. जर्मनीत वाढणाऱ्या बालकावर अतिरेकी राष्ट्रवादाचा परिणाम आढळतो, तर जपानी मुलांवर त्यांच्या समाजाने स्वीकारलेल्या प्रामाणिकपणा व दीर्घोद्योग या मुल्यांचा परिणाम आढळतो. सामाजिक स्थितीचा परिणाम व्यक्तिमत्त्वावर होतो.
६. प्रसार माध्यमे :
प्रसार माध्यमांमुळे आजच्या विज्ञान युगात बालपणा- पासूनच व्यक्तीचा तंत्रज्ञानाशी संबंध येतो. प्रसार माध्यमांचा माफक व विधायक वापर व्यक्तिमत्त्व अधिक विवेकी बनण्यास कारणीभूत ठरतो. प्रसार माध्यमांमुळे जगातील घडामोडी, घटना काही क्षणात सर्वांना माहित होतात. यामुळे व्यक्तिमत्त्वात सतत सुधारणा होत राहते. दूरदर्शन, चित्रपट, वर्तमानपत्रे, रेडिओ, इंटरनेट, मोबाईल आधुनिक युगात व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर वेगाने व मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. दूरदर्शन, वर्तमानपत्र व त्यातील जाहिराती, मोबाईलवरील संदेश फेसबुकवरील संदेश इत्यादीमुळे व्यक्तीच्या वृत्तीत व श्रद्धांमध्ये बदल होत आहे. ज्या घरात दूरदर्शन संच आहेत त्या मुलांच्या जीवनविषयक कल्पना व जेथे दूरदर्शन प्रक्षेपण नाही तेथील मुलांच्या कल्पना यात तफावत आढळते. दूरदर्शन व इंटरनेटमुळे माहितीच्या धबधब्याखाली व्यक्तिमत्त्व न्हाऊन निघत असली तरी त्यांची क्रियाशिलता मात्र कमी होत आहे. एकूणच प्रसारमाध्यमे ही व्यक्तिमत्त्व विकासात प्रभाव टाकणारे घटक आहेत.
७. संस्कृती :
निरनिराळ्या संस्कृतीत वाढणाऱ्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वात फरक असतो. भारतीय संस्कृतीत वाढणाऱ्या मुलांमध्ये भारतीय संस्कृतीची छाप दिसते तर पाश्चात्य संस्कृतीतील मुलांमध्ये पाश्चिमात्य संस्कृतीची छाप असते. मानवी परंपरा, शिष्टाचार, आचार-विचार या सर्वांचे प्रतिबिंब संस्कृतीत आढळते. सांस्कृतिक मुल्यांचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो व तसे व्यक्तिमत्त्व घडते. धार्मिक श्रद्धा या सर्व पुढारलेल्या व मागासलेल्या समाजात अस्तित्वात असतात. एस्किमो जमातीत भूतांवर विश्वास असतो. म्हणून आजारी माणसाची भूतबाधा उतरावी म्हणून त्यांचा धर्मगुरू ध्यानस्थ बसतो. ख्रिश्चन समाजात रोग्यांवर औषधोपचार व विश्रांती बरोबरच गरम सूप पिण्याचा सल्ला धर्मगुरू देतो. त्यानंतर रोगी बरा व्हावा म्हणून गुडघे टेकून देवाची प्रार्थना करतो. या दोन्ही संस्कृतीमध्ये आजारावरील उपचाराच्या पद्धतीचे संस्कार व्यक्तीवर होऊन व्यक्तिमत्त्व घडत असते. प्रत्येक संस्कृतीत काही संकेत असतात.
उदा. आजही हिंदू संस्कृतीत वाढदिवस केक कापून, त्यावर मेणबत्त्या लावून साजरा होतो. प्रत्येक समाजात स्वागताचे भिन्न भिन्न प्रकार असतात. उदा. हस्तांदोलन करणे, नमस्कार करणे, स्वागत करणे, निरोप देणे या गोष्टींचे भिन्न भिन्न अविष्कार आहेत. ते त्या संस्कृतीचे संकेत ठरून त्यानुसार व्यक्तिमत्त्व घडते. प्रत्येक संस्कृतीत काही गोष्टी उचित व काही गोष्टी अनुचित मानल्या जातात. त्यांचाही प्रभाव व्यक्तिमत्त्वावर पडतो. नामकरण विधी, जन्मविधी, मरणोत्तरविधी, लग्नविधी या सांस्कृतिक बाबींमध्येही आपणास भेद आढळतो. या सर्व बाबींचा प्रभाव व्यक्तिमत्त्व विकासावर पडत असतो.
अशा प्रकारे अनुवंशिक व परिस्थितीजन्य घटक यांचा सयुक्त प्रभाव होऊन व्यक्तिमत्त्व विकास होत असतो.
Q.२ व्यक्तिमत्व विकासाच्या युक्त्या (Strategies for Personality Development)
१) आत्मनिरीक्षण :
स्व जाणीव (Self Awareness) स्वतः चे आंतरिक खरेखुरे मूल्यमापन करा. कोणत्या बाबी तुम्हाला उत्कृष्ट पद्धतीने करता येतात, त्याची यादी बनवा. कोणत्या बाबी तुम्ही फक्त करू शकतात. त्यात निपुणता नाही. आणि कोणत्या बाबी अजिबातच येत नाही. परंतु त्या तुम्हाला याव्या असे वाटते. या सर्वांची यादी बनवा
२) वाचन करा.
चांगल्या वाचनाने स्वतःचा विकास नक्कीच होतो. म्हणून तुम्ही स्वतः ठरवा कोणते पुस्तक कोणते जर्नल, माहिती तुम्हाला वाचायची आहे. एक गरज पूर्ण झाली की, मानव दुसरी गरज पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असतो, ती पूर्ण झाली की, तिसरी याप्रमाणे गरजा पूर्ण करता करताच व्यक्तीचा विकास होत जातो. चांगल्या लेखकांची पुस्तके वाचल्याने अनेक कौशल्यांचा विकास होतो. जसे एकाग्रता, समानानुभूती, चिकित्सक, सर्जनशील विचार इत्यादी.
३) मार्गदर्शक शोधा
ज्या गोष्टीत तुम्ही कमी आहात, त्यात सुधारणा करण्यासाठी योग्य मार्गदर्शकाची निवड करा मार्गदर्शकाचे वय बघितले जात नाही तर त्याचे कौशल्ये बघितली जातात, ज्यावर तुम्ही विश्वास करू शकतात, असाच मार्गदर्शक निवडा.
४) स्वतःच्या विकासासाठी योजना (Plan) कार्यनीती तयार करा
तुम्हाला भविष्यात काय व्हायचे आहे? तुम्ही स्वतःला कोणत्या ठिकाणी पाहू इच्छिता? म्हणजेच स्वतःच्या जीवनाचे धैर्य ठरवले पाहिजे. जितक्या लवकर तुम्ही तुमच्या जीवनाचे धैर्य ठरवणार तितक्या लवकर तुम्हाला ते प्राप्त करण्यासाठी योजना, कार्यनीती (Action Plan) तुम्हाला तयार करता येतील. त्या कार्यनीतीच्या अंमलबजावणीमुळेच तुम्हाला आत्मप्रेरणा मिळून तुम्ही प्रगतीशील होणार.
५) आपल्या यशाच्या नोंदी ठेवा
तुम्ही जी कौशल्ये गुण, क्षमता, चांगल्या सवयी, निपुणता मिळवत जाणार आहात. त्यांच्या नोंदी डायरीत ठेवा. जेणेकरून स्व-प्रेरणा तुम्हाला प्राप्त होणार. तुमच्या ध्येयापासून तुम्ही किती दूर आहात, याचादेखील आढावा घेता येईल.
६) समूह बनवा :
तुम्हाला जीवनात जे मिळवायचे आहे म्हणजेच तुमचे ध्येय आणि तुमच्यासारखेच ध्येय ठेवणाऱ्या आणि कार्यरत असणाऱ्या मित्रांचा समूह बनवा स्व-विकास करायचा असेल तरी ही दुसऱ्या व्यक्ती ज्या तुमच्यासारखेच कार्य करत आहात. त्यांच्या समूहात तुम्ही राहिलात तर तुमचा विकास लवकर होईल. अभ्यास करत असतांना तो इतरांसोबत चर्चा करून केला तर लवकर लक्षात राहते. इतरांचे अनुभव, त्यांना पडलेले प्रश्न, अडचणी यादेखील आपल्यासमोर येतात आणि त्यातून आपण बरेच काही शिकत जातो.
७) स्वतःच स्वतःचे न्यायाधीश बना
इतरांना दाखवण्यासाठी तुम्ही दिवसभर पुस्तक हातात धरून ठेवणे किंवा ऑनलाईन क्लास करण्याचा बहाणा करून तुम्ही गाणे ऐकत असाल तर तुमचा स्वतःचा विकास होऊ शकत नाही. पालकांनी, भावडांनी, मित्रांनी सांगून तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्ही एका पातळीपर्यंत यशस्वी होऊ शकतात. पण तुमचे ध्येय, आत्मविकास होईलच असे नाही. म्हणून स्वतःच स्वतः चे न्यायाधीश बना आणि आपल्या कार्याचे मूल्यमापन करा.
(८) आपल्या यशाची अपयशाची जबाबदारी स्वतः स्वीकारा
काही व्यक्तींना संरक्षण यंत्रणेचा जास्तच वापर करून नेहमीच आपल्या अपयशाचे खापर दुसन्यांवर टाकण्याची वाईट सवय असते. उदा. परीक्षेत चांगले गुण मिळाले नाही तर पेपर कठीण होता. माझ्या आई-बाबांनी मला क्लास लावून दिला नाही. पेपर लवकर घेतला. पाहुणे आलेले होते म्हणून अभ्यासच झाला नाही, अशी अनेक कारणे सांगता येतात. परंतु ज्याला खरोखरच प्रगती करावयाची आहे. तो कोणतेच कारण पुढे न करता अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो. उदा. माझे नशीबच चांगले नाही. नाहीतर त्या जरचूचे नशीब केवढे चांगले. सर्व प्रश्न तीने वाचलेलेच आले. आपल्या अपयशाचे खापर नशिबावर न फोडता आपल्या कार्याला, कर्माला, कृतीला कारणीभूत ठरवा,
Q.३ व्यक्तिमत्व विकासाचे फायदे (Benefits of Personality Development)
१) स्व-जाणीव व्यक्तीत निर्माण होते.
२) स्वतः च्या बुद्धीचा, कौशल्यांचा, क्षमतांचा विकास होतो.
३) स्वतःच्या सुप्त गुणांची जाणीव निर्माण होते.
४) स्वतः च्या विकासामुळे मानवी संसाधनात भर पडते.
५) जीवनाची गुणवत्ता उंचावते.
६) व्यक्ती आनंदी, समाधानी जीवन जगायला लागते.
७) व्यक्ती नवनवीन गोष्टी आत्मसात करते.
८) जीवनातील बदलाचा सहज स्वीकार केला जातो.
९) जीवनातील समस्यांना चांगल्या प्रकारे सोडवण्यासाठी तयार होतात.
१०) व्यक्तीचा आत्मविश्वास वाढीस लागतो.
११) आंतरव्यक्ती संबंध सकस विकसीत होतात.
१२) आत्मविकासामुळे व्यक्तीचे लक्ष गुणात्मकतेकडे जास्त असते.
Q. ४ 'स्व व्यवस्थापन'
'स्व व्यवस्थापन' हे एक महत्त्वाचे जीवन कौशल्य आहे. म्हणून याचा विकास होणे गरजेचे आहे. या कौशल्यांचा विकास खालील पद्धती व तंत्राचा वापर करून विकसित करता येतो.
१) ध्यान करणे (Meditation):
ध्यान-धारणा केल्याने चित्त एकाग्र होते. आपल्या जाणीवेचे केंद्र एकवटते. आपण काय विचार करतो, याकडे आपले लक्ष एकवटते काही वाक्ती खूप जास्त विचार करणाऱ्या असतात, त्या विचारात स्व-जाणीवेचा विसर पडतो. परंतु नियमित ध्यान केल्याने ताण-तणाव कमी होतात, आपले उद्दिष्ट आपल्याला गवसते. चांगल्या विचारांकडे म्हणजेच सकारात्मक विचारांकडे लक्ष केंद्रित होते. एक आत्मऊर्जा प्राप्त होते. त्या ऊर्जेच्या जोरावरच आपल्याला 'स्व- जाणीवेची प्रचिती येते. म्हणून नियमित, एकाग्रचित्ताने ध्यान केल्याने 'स्व-जाणीवेचा विकास होत जातो.
२) योग करणे
नियमित योग केल्याने शारीरिक स्वास्थ तर लागतेच त्याचबरोबर मानसिक स्वास्थदेखील लाभते. सकारात्मक उर्जा प्राप्त होते.
३) दैनंदिनी/रोजनिशी लिहिणे
दैनंदिनीत तुम्हाला आवडणाऱ्या, न आवडणाऱ्या गोष्टी लिहून ठेवणे तुम्हाला काय करायला आवडते? तुमची स्वप्ने काय आहे? घरातील संवाद इ. गोष्टींची नोंद रोजनिशीमध्ये घेणे तुमच्यात कोणती कौशल्ये आहे इ. गोष्टींची नोंद त्या डायरीत ठेवावी वेगवेगळे अनुभव, वेगवेगळे प्रसंग, त्या प्रसंगावरील प्रतिक्रिया रोज घडणाऱ्या घटनेचा बारीक-सारीक तपशील त्या रोजनिशीत लिहून ठेवणे जेणेकरून प्रत्येक घटनेकडे व आपल्या त्यावरच्या प्रतिक्रिया नोंदवता येतील. त्या प्रतिक्रियांकडे तटस्थरित्या बघितल्याने आपण आपल्याला समजत जाणार आहोत.
४) दुसऱ्याच्या प्रतिक्रिया स्वीकारणे
आपल्या कृतीवर दुसऱ्यांच्या प्रतिक्रियांचा सकारात्मकरित्या स्वीकार करायला शिकणे गरजेचे आहे. फक्त वरवरून चांगल्या म्हणणाऱ्या व्यक्तीकडून प्रतिक्रिया घेण्यापेक्षा आपल्याबद्दल सद्भावना ठेवणाऱ्या खऱ्या मित्र-मैत्रिणींकडून प्रतिक्रिया घेतल्याने आपल्याला आपली क्षमता, प्रभाव, कमतरता, त्रुटी लक्षात येतात. त्यात सुधारणा करण्यासाठी वाव असतो. म्हणूनच निंदकाचे घर असावे शेजारी ही म्हण येथे साजेशी वाटते. ५) स्वतः चे SWOT विश्लेषण करणे स्वतःच स्वतः चे SWOT द्वारा विश्लेषण करणे. याच्या माध्यमातून स्वतःला स्वतःचे बलस्थाने, कमतरता, संधी व संभाव्य धोके यांचे ज्ञान / जाणीव होईल. त्रुटी कमी करण्याचा प्रयत्न करता येईल. योग्य संधीची निवड करता येईल. संभाव्य धोके टाळण्यासाठी प्रयत्न करता येईल.
६) वस्तुनिष्ठ पद्धतीने स्वतः कडे पाहणे
ज्याप्रमाणे आरशात आपल्याला स्वतःचे बाह्य प्रतिबिंब हुबेहूब दिसते. त्याचप्रमाणे आपल्या विचार, मूल्ये, वर्तन, भावना इ. चे हुबेहूब प्रतिबिंब बघण्याची क्षमता स्वतःमध्ये विकसित करणे आवश्यक आहे. आपल्या प्रत्येक वर्तनाचे, कृतीचे आपण समर्थन केलेच पाहिजे असे नाही.
Social Plugin