विवाह आणि आनंदीवृत्ती (Marriage & Happiness)


 विवाह आणि आनंदीवृत्ती (Marriage & Happiness)

जीवनाची सार्थकता विवाहातून होते. वैदिक तत्त्वज्ञानानुसार धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थाची पुर्ती विवाहातून होते. विवाह हा एक संस्कार आहे. विवाह म्हणजे दोन जीवांचे मिलन. विवाहातून कामपूर्ती, संतती प्राप्ती होते. भारतीय संस्कृतीनुसार धार्मिक संस्कारासाठी विवाह आवश्यक असतो. स्त्री-पुरुष एकमेकांना परस्पर पूरक असतात. एकटी स्त्री अथवा एकटा पुरुष सर्वार्थाने परिपूर्ण नसतो. अर्धनारी नटेश्वर हे त्याचेच प्रतिक आहे. विवाहबंधनातून एकत्र येऊन स्त्री-पुरुष परस्परांना पुरक ठरतात. विवाहातून एकटेपणाची भावना दूर होते, कुणीतरी जीवन सहचारी मिळतो आणि जीवन संकटांचा संघटीतपणे सामना करता येतो. पण खरच वैवाहिक व्यक्ती इतक्या सुखी असतात का? बरेच वैवाहिक जोडीदार असे मानतात की विवाह म्हणजे खुप मोठी जबाबदारी आहे, स्वतः ला अनेक बंधनात अटकून घेण्याचे ते साधन आहे. म्हणून वैवाहिक व्यक्ती म्हणतात की विवाह म्हणजे अशी स्थिती की लग्न करतो तो पश्चाताप दग्ध होतो आणि न करणाराही सुखी नसतो.

संशोधकांनी विवाहबद्ध जोडप्यांची विवाह न केलेल्या व्यक्तींशी, घटस्फोटीत अथवा वैधव्य प्राप्त झालेल्या व्यक्तींशी तुलना केली. या संदर्भात शंभरापेक्षा अधिक संशोधनाचा आढावा घेता असे  दिसून आले की, वैवाहिक व्यक्ती अधिक आनंदी, संतुष्ट, आणि अधिक खुशाल दिसतात. 

 १. विवाहाचे फायदे (Benefits of Marriage)

  • एकटेपणाच्या ऐवजी कोणाच्या तरी सहवासाची गरज ही मानवाची मूलभूत गरज आहे. विवाहातून ती पुर्ण होते.
  • स्थिर व सुखी दांपत्य जीवनातील व्यक्तींचे शारीरिक व भावनिक जीवन सुखी असते.
  • कुणाशी तरी जिव्हाळ्याचे संबंध असावे, प्रेमाचे संबंध असावे हे व्यक्ती जीवनातील एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. ते विवाह आणि मैत्रीमुळे साध्य होते.
  • विवाहातून परस्परांचे प्रेमसंबंध दृढ होतात. संकट काळात जोडीदाराची मदत मिळते.
  • जोडीदार आणि पालक भूमिका निभावतांना स्वतःचा नवीन कौशल्याचा विकास होतो. पर्यायाने स्व-आदर आणि समाधानाच्या भावनेत वाढ होते. यामुळेच घटस्फोटित अथवा जोडीदार दुरावलेले दाम्पत्य / व्यक्तीत एकटेपणाचे भाव अधिक प्रमाणात दिसतात. घटस्फोटीत व्यक्तीला घटस्फोट हा जीवनातील सर्वांत मोठा मानसिक धक्का वाटतो. मानसिक आधार जातो. हक्काची प्रेम करणारी अशी व्यक्ती दुरावते. आणि म्हणून अशा व्यक्ती दुःखी, निराश, मानसिकदृष्ट्या व्यथीत दिसतात.विवाह व्यक्तीच्या जीवनात महत्त्वाचा असतो म्हणूनच घटस्फोटाचा इतका विपरीत परिणाम होतो की त्यापेक्षा लग्न न केलेलेच बरे असे व्यक्तीला वाटते. अशा व्यक्ती व्यसनाधीन होतात. त्यांच्यात अधिक वैरभाव, मत्सरभाव, लैंगिक भावनांचा अभाव दिसतो. थोडक्यात घटस्फोटाचे परिणामही तितकेच वाईट असतात.
  • एकंदरीत विवाह न केलेल्या व्यक्तींपेक्षा वैवाहिक जीवन जगण्याऱ्या व्यक्ती अधिक सुखी-समाधानी राहतात. मात्र अमेरिकेत उपबोधन कर्त्यांकडे येणाऱ्या मध्ये (Client) वैवाहिक जीवनातील समस्याग्रस्त लोकांचे प्रमाण अधिक दिसून येते.