कौटूंबिक समस्या आणि समाधान ( Family Problems & Solutions):
कौटूंबिक संकटे दोन प्रकाराने येत असतात. एक म्हणजे कौटूंबिक घटकामधूनच निर्माण होणारी उदा. घटस्फोट, अनैतिक संबंधातून आलेले मुल, कुटूंब कलह, भांडणे इ. दुसरे म्हणजे कुटूंबबाह्य घटकांमधून निर्माण होणारी उदा. पूर, भूकंप, स्थलांतर आर्थिक आणीबाणी इ. कुटूंबातील एखाद्या सदस्यांचा मृत्यू, अपघात, आजारपण, पुर्नविवाह, गर्भधारणा या घटकांमुळेही कौटूंबिक समस्या निर्माण होतात. कुटूंबाच्या सामाजिक, आर्थिक दर्जात अचानक बदल झाल्यासही समस्या निर्माण होतात. पती-पत्नी, पालक-बालक किंवा भावंडाभावंडामध्येही मतभेद असल्यास समस्या निर्माण होतात.
काही महत्वाच्या कौटूंबिक समस्याः
1. घटस्फोट :
आजच्या काळात घटस्फोटांचे प्रमाण वाढत चालले आहे. जसजसा विवाह अयशस्वी होतो, तसतसे जोडीदारांमध्ये असमाधान निर्माण होते. आणि त्याची परिणती घटस्फोटामध्ये होते. कमठेकर (१९८१) यांच्यामते दोघांही जोडीदारांचे व्यक्तिमत्व, गुणधर्म भिन्न असल्यास घटस्फोटाची शक्यता वाढते. त्याचप्रमाणे वादग्रस्त कुटूंबातुन आलेली मुले यांच्यातही घटस्फोट घेण्याचे प्रमाण अधिक असते. पदवीधर पुरूष, ज्यांची आर्थिक मिळकत चांगली आहे अशा पुरूषांमध्ये वैवाहिक स्थैर्याचे प्रमाण अधिक असते. याउलट ज्या स्त्रियांची आर्थिक मिळकत जास्त आहे, त्यांच्यात घटस्फोटांचे प्रमाण अधिक असते. जोडीदारापासून बिलग होणे हा अनुभव गुंतागुंतीचा व कठीण असतो. (पॉल बोहॅनन १९७०)
घटस्फोटाचे परिणामः जोडीदाराच्या मृत्यूपेक्षाही घटस्फोटाचे परिणाम अधिक गंभीर होतात.
- मानसिक ताण वाढतो. आर्थिक, लैंगिक एकाकीपणाच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. घटस्फोटाचे गंभीर परिणाम स्त्रियांवर अधिक होतात. त्यांना समाजात वावरणे संकोचाचे वाटते.
- पालकांच्या घटस्फोटाचा परिणाम मुलांच्या वर्तनावर व अध्ययनावर होतो. मोठी मुले राग व चीड व्यक्त करतात. मुलांप्रमाणेच घटस्फोटीत व्यक्तीवरही घटस्फोटाचे परिणाम दिसून येतात.
- आर्थिक समस्या निर्माण होतात, पती पत्नीची आर्थिक मिळकत कमी होते. मानसिक ताण निर्माण होतो. बऱ्याच स्त्रियांमध्ये अपराधी भावना, लज्जा, प्रतिकुलता, क्रोध आणि भविष्याबाबत चिंता निर्माण होते. समाजात वैवाहिक दांपत्य केंद्रीत जीवनाला महत्व असल्याने समाजातील महत्व कमी होते. लैंगिक समस्या निर्माण होतात. व्यक्तीत एकाकीपणाची भावना येते.
घटस्फोट टाळण्याचे उपायः
घटस्फोटामधून घसरते संबंध स्पष्ट होतात. घटस्फोटाचा विचार करण्याऐवजी वैवाहिक संबंध आणि कौटूंबिक जीवन कसे समाधानकारक होईल हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवावयास हवे. वैवाहिक यश वाढून अयशस्वी विवाह आणि घटस्फोटांचे प्रमाण कमी करण्यासाठी खालील गोष्टी कराव्यात.
१) शाळांमधून आणि महाविद्यालयांतून कौटूंबिक जीवनाविषयी आणि मानवी संबंधाविषयी शिक्षण दिले जावे. मानवी संबंध आणि यशस्वी विवाह निर्माण करणारे घटक ओळखून जोडीदाराची निवड परिणामकारकपणे कशी करता येईल यावर भर द्यावा.
२) संशोधनात असे आढळले की, ज्यांचा विवाह विशीपुर्वी झाला त्यांच्यात घटस्फोट घेण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. म्हणून योग्य वयात परिपक्क झाल्यावर विवाहासाठी कायद्याने परवानगी द्यावी आणि विवाहपूर्व समुपदेशन (Counselling) केल्याशिवाय विवाहाला परवानगी दिली जाऊ नये. म्हणजेच विवाहपूर्व समुपदेशन सक्तीचे करावे. ३) संपूर्ण वैवाहिक जीवनभर सातत्याने विवाह आणि कुटूंबासाठी समुपदेशन सेवा अधिक प्रमाणात उपलब्ध करून द्यावी. घटस्फोट देण्यापूर्वीही दांपत्याला समुपदेशन करण्याचा फायदा होतो. समुपदेशनामुळे त्यांच्या समस्या सोडला अधिक धन आणि समाधानकारक संबंधाचा विकास करता येईल.
2. मृत्यूः
ही एक कुटूंबातील महत्वाची समस्या आहे. मरणाऱ्या व्यक्तीला आपला मृत्यू जवळ आला आहे ही कल्पना सहन होत नाही. अशावेळी त्याला इतर कुटुंब सदस्याकडून मानसिक आधाराची गरज असते. कुटूंबाच्या दृष्टीकोनातून हा एक तणाव, भीती, दुःख, सतत आवडती व्यक्ती जाणार याची खंत निर्माण करणारा कालखंड असतो. तसेच आजारी व्यक्तीची शुश्रूषा करणेही अवघड समस्या असते. कारण त्यामध्ये वेळ आणि शक्तीची गरज असते. अशा वेळी आजारी व्यक्तीला मानसिक आधार दिल्यास, आणि कुटूंबातील जबाबदारीचे वितरण केल्यास दुःख हलके होण्यास मदत होते.
3. अंमली पदार्थांचा वापर / व्यसनाधिनता:
व्यसनाधिनता ही आज समाजात आपल्याला प्रत्येक स्तरात दिसून येते. काहीतरी नवीन अनुभव किंवा समवयस्कांचे दडपण, तणावामधून बाहेर पडण्याचा मार्ग यामधून अंमली पदार्थ सेवनाला सुरूवात होते. व्यसनाधिनतेमुळे कुटूंबावर विपरित परिणाम होतात. मद्यपानामुळे कौटूंबिक जीवन उध्दवस्त होते. पूर्ण घराची राखरांगोळी करायलाही व्यक्ती कमी करत नाही. पत्नी, मुले, आईवडील, नातेवाईक यांच्याशी तिचे संबंध दुरावतात. व्यसनामुळे पैसा जात असल्याने जीवनाश्यक गरजां देखील पूर्ण होत नाहीत. स्त्री देखील अशा व्यसनाला कंटाळते. पती पत्नीत रोज भांडणे, संघर्ष होतात. त्यांचा परिणाम म्हणून घटस्फोट होतो. मद्यपानामुळे व्यवसायावर विपरित परिणाम होतो. कामाच्या ठिकाणी मद्य घेऊन गेल्यामुळे एखादे वेळी अपघात होऊ शकतो. नोकरी जाण्याची शक्यता असते. सतत मद्यपान करणाऱ्या व्यक्तींना समाजात प्रतिष्ठा मिळत नाही.
4. विवाहबाह्य संबंध / व्याभिचार:
साधारणतः विवाहित व्यक्तीने परस्त्रीगमन व परपुरुषगमन केल्यास त्याचा विवाहबाह्य संबंध किंवा व्याभिचार असे म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीचे लग्न झालेले आहे. परंतु तरीही ती इतर व्यक्तीशी (स्त्री- पुरूष) लैंगिक संबंध ठेवते. असे संबंध गोपनीय असतात. हे संबंध केवळ त्या दोघांनाच माहीत असतात. असे संबंध ठेवण्यात अनेक अडचणी असतात, तरीही. त्या दोघांमध्ये असे कायमस्वरूपी संबंध राहतात. अशा संबंधाची कारणे ही वेगवेगळी असू शकतील.
व्यक्तीला तिचा जोडीदार न आवडणे, जोडीदारामध्ये सतत होणारे मतभेद, भांडणे आणि विसंवाद होणे, जोडीदाराला क्षय, अस्थमा, कर्करोग यासारखे दुर्धर रोग ऐन तारूण्यात असतील. लैंगिक गरज भागविण्याकरता विवाहबाह्य संबंध ठेवणे, पती जर घराकडे दुर्लक्ष करत असल्याप्त आर्थिक परिस्थितीमुळे दुसऱ्या पुरूषांशी संबंध ठेवण्याची शक्यता असते. याशिवाय जोडीदाराला मानसिक आजार असणे, जोडीदाराचा मृत्यू इ. मुळेही असे संबंध ठेवले जातात.
व्याभिचार वरील कोणत्याही कारणांमुळे केलेला असेल तरी असे संबंध उघड झाले तर पती पत्नीमध्ये वाद होतात, कलह वाढतात. दोघेही एकमेकांशी परक्यासारखे वागू लागतात. पत्नीकडून व्याभिचारी वर्तन झाले तर पुरूष तिचा त्याग करतो. पुरूषाने व्याभिचार केला तर पत्नी त्रागा करते. मुलांवर त्याचा वाईट परिणाम होतो. वैवाहिक संबंध बिघडतात. काही वेळा व्यक्ती घटस्फोट घेण्यास प्रवृत्त होते.
5. हुंडा घेणे :
हुंडा म्हणजे विवाहप्रसंगी वराने वधूकडून घेतलेली संपत्ती होय. हुंडापध्दती ही हिंदू समाजाला असलेला शाप आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झालेले आहेत. विवाहात नात्यातील किंवा ओळखीच्या इतर मुलांपेक्षा कमी हुंडा मिळाला तर घरात मुलीला त्रास दिला जातो. तिचा छळ केला जातो. कधी कधी मुलीला मारहाण करतात, जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला जातो. कित्येक मुलींचे विवाह पैशांच्या अडचणींमुळे होत नाहीत. हुंडा प्रथेमुळे मुलगी जन्माला आली की तिची हत्या केली जाते. मुलींना तिरस्कारयुक्त वागणूक दिली जाते.
हुंड्याची समस्या सोडविण्याचे उपायः
- शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीच्या मनात हुंड्याविरोधी मत केले पाहिजे, वर्तमानपत्रे, दूरदर्शन, मासिके, रेडीओ, चित्रपट इ. माध्यमाद्वारे जनमत करणे सहज शक्य आहे.
- स्त्रियांना देखील शिक्षण देऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे आवश्यक आहे.
- आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिल्यास विवाहाची व हुंड्याची कमी होईल.
- ज्या समाजात प्रेमविवाह होतात, तेथे हुंडा पध्दत आढळत नाही. म्हणून प्रेमविवाहांना उत्तेजन दिले पाहिजे.
- कायदेशीर उपाय दिनांक १ जुलै १९६१ ला हुंडाबंदीचा कायदा लागू करण्यात आलेला आहे, त्याची विधायक अंमलबजावणी केली गेली पाहिजे.
6. लैंगिक समस्याः
लैंगिक समस्या ही वैवाहिक संबंधातून स्पष्ट होते. लैंगिक संबंधास प्रथम विवाहित असणे आवश्यक समजले जाते. जरी लैंगिक समस्या ह्या लैंगिक संबंधातून निर्माण होत असल्या तरीही त्या प्रामुख्याने वैवाहिक संबंधाच्या आंतरक्रियांवर अवलंबून असतात. लैंगिक संबंधातील व्यक्तीच्या तथाकथीत काही अपसमज, अतार्किक श्रध्दा, समजुती आणि अज्ञान असते की त्यामुळे संबंधात समस्या निर्माण होतात.
वैवाहिक समस्या सोडवण्याचे उपायः
- स्वतःच्या विचारांचे परीक्षण करणे.
- वस्तुनिष्ठ संवाद साधणे, त्यासाठी समोरच्या व्यक्तींचे बोलणे प्रथमतः ऐकूण घेणे, त्यातून निर्माण झालेली समस्या सोडवण्याचा मार्ग मिळू शकतो.
- प्रत्येक व्यक्तीने स्वतः च्या सवयींमध्ये योग्य ते बदल घडवून आणणे आवश्यक असते.
- स्वतःच्या भावनांचा आदर करून दुसऱ्यांच्या भावनांची कदर करणे.
- भूमिका वठविणे, म्हणजे आपण जोडीदारांच्या जागी असतो तर काय केले असते. याचा विचार करून वर्तन करणे.
- प्रत्येक घटनेकडे, मतभेदाकडे डोळसपणे पाहून त्याचे विश्लेषण करणे.
- पती-पत्नीनेवैवाहीक संबंध बिघडल्यास समुपदेशकाची मदत घ्यावी.
Social Plugin