प्रभावी / परिणामकारक अध्यापन पद्धती (Effective Teaching Method) :
अध्ययन-अध्यापन ही द्विमार्गी प्रक्रिया आहे. अध्यापन करतांना शिक्षक- विद्यार्थी त्यांच्यात आंतरक्रिया घडत असतात. वर्गातील सर्वच विद्यार्थी एक सारखे नसतात. प्रत्येक विद्यार्थ्यांची मानसिक क्षमता ही भिन्न-भिन्न असते. ही व्यक्तीभिन्नता शिक्षकांना लक्षात घेऊन शिक्षकांना अध्यापनाची पद्धती ठरवावी लागत असते. अध्ययनाची परिणामकारकता साधण्यासाठी आणि शैक्षणिक उद्दीष्टे साध्य करण्यासाठी प्रभावी अध्यापन पद्धती सुचविण्याचे कार्य शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ करतात. या अध्यापन पद्धतीपैकी कुठली अध्यापन पद्धती अधिक प्रभावी आहेत हे सांगणे कठीण असले तरी शिक्षक विद्यार्थ्यांची कुवत आणि स्तर ओळखून अध्यापन पद्धती ठरवत असतो.
आधुनिक शैक्षणिक मानसशास्त्रात खालील काही नवीन अध्यापन पद्धतींचा अवलंब केला जाऊ लागला आहे.
१) गट चर्चा (Group discussions) :
"चर्चा म्हणजे कोणत्याही समस्येचे, प्रश्नाचे, विषयांचे सर्वांनी मिळून केलेले सर्वांगीण विवेचन, विश्लेषण, मूल्यमापन होय."
वर्गामध्ये चर्चा पद्धतीचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे करून घेता येतो. काही चर्चामध्ये शिक्षक स्वतः पुढाकार घेऊन स्वतः चर्चेचे संचालन करतो. तर काही चर्चाची जबाबदारी, नेतृत्व व संचालन पुर्णपणे विद्यार्थ्यांवर सोपविली जाते. शिक्षक केवळ एक निरीक्षक या नात्याने उपस्थित असतो. काही चर्चा या अनौपचारिक पद्धतीने केल्या जातात तर काही अगदी योजनाबद्ध पद्धतीने केल्या जातात.
चर्चापद्धतीतील दुसरा प्रकार म्हणजे विद्यार्थी संचलित चर्चा पद्धत हीच या प्रकारांत विद्यार्थी स्वतःच चर्चेचे संयोजन, या प्रकारांत विद्यार्थी स्वतःच चर्चेचे संयोजन, संचालन, नियंत्रण करतात. विद्यार्थ्यांपैकीच एक अध्यक्ष असतो. तो किंवा इतर कोणी विद्यार्थी विषयाची पार्श्वभूमी वर्गासमोर मांडतो व चर्चे ला प्रारंभ होतो. विद्यार्थी आपापली मते सांगत असतात. चर्चेची नोंद करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांपैकीच एकावर सोपवली जाते. अध्यक्ष चर्चेचे संचालन करीत असतो. एकावेळी एकानेच बोलावे, एकानेच फार वेळ बोलू नये व विषयाची पुनरावृत्ती टाळावे. या सर्व नियमांची अंमलबजावणीची जबाबदारी विद्यार्थी अध्यक्षांवरच असते.
गटचर्चा हा चर्चा पद्धतीचाच एक प्रकार आहे. यामध्ये विद्यार्थ्याचे गट केले जातात व त्यांना विषय दिला जातो. इतर विद्यार्थी श्रोत्यांची भूमिका करतात. गटातील संख्या साधारणपणे ४ ते ८ असते. विद्यार्थी दिलेल्या विषयाची चांगल्या प्रकारे तयारी करतात. शक्यतो विद्यार्थी वेगवेगळा दृष्टीकोन घेवून त्यावरच भर देतात, त्यानंतर वर्गात हे विद्यार्थी व्यासपीठावर बसून चर्चा करतात. इतर विद्यार्थी त्यांची चर्चा ऐकतात. चर्चा पूर्ण झाल्यावर श्रोत्यांमधील विद्यार्थीही प्रश्न विचारू शकतात व व्यासपीठावरील विद्यार्थी त्यांना उत्तरे देतात. या पद्धतीतही एखादा अध्यक्ष असतो. तो चर्चेचा समारोप करत असतो. गटचर्चा] पद्धतीचा आणखीही वेगळ्या पद्धतीने उपयोग करून घेता येतो. तो म्हणजे संपूर्ण वर्गातील विद्यार्थ्यांचे लहान लहान अशा ४/५ गटामध्ये विभाजन करून अध्यापन करणे, हे विभाजन विद्यार्थ्याच्या पात्रतेनुसार किंवा बुध्दीमत्तेनुसार केल्यास ते अधिक उपयोगी ठरते. यासाठी प्रथम शिक्षकाने त्या आशयातील किंवा घटकांतील मुलभूत व महत्वाची अशी तत्वे, सूत्रे इ. चे स्पष्टीकरण करावे. त्यानंतर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना अनुलक्षून प्रश्न करावे. आणि नंतर विद्यार्थ्यांचे वेगवेगळया गटात विभाजन करावे. प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांची संख्या १० पेक्षा अधिक नको. प्रत्येक गटाने दिलेल्या प्रश्नावर किंवा समस्येवर चर्चा करावी. इतरांना त्रास होणार नाही. अशा पद्धतीने त्या गटाला चर्चा करण्यास सांगितले जाते.
अशा चर्चा पद्धतीने अध्यापन केल्यास वर्गातील वातावरण चैतन्ययुक्त बनते. अर्थात चर्चा पध्दतीने पाठ घेण्यासाठी शिक्षकाला विषयाची सर्व बाजूंनी भरपूर तयारी करावी लागते. कारण चर्चेच्या ओघात त्या त्या विषयासबंधी मुलांच्या मनात शंका निर्माण होवू शकतात. म्हणून विषयाच्या अनुरोधाने त्या शंकाचे निरसन शिक्षकाला करता आले पाहिजे.
२) प्रकल्प पध्दती (Project Method) :
प्रकल्प पद्धतीला योजना पद्धती, व्यवसाय पदधती, प्रोजेक्ट पद्धती या नावांनी संबोधले जाते. 'प्रोजेक्ट' म्हणजे प्रकल्प. शिक्षणक्षेत्रात विद्यार्थी ज्या प्रतिकृती वा नमूने तयार करत काही उपक्रम कार्यान्वित करतात त्यासाठी ही शब्दयोजना करण्यात येवू लागली. प्रोजेक्ट या संकल्पनेचा शिक्षणक्षेत्रातील अर्थ सर्वप्रथम डॉ. डब्लू एच किलॅपट्रीक यांनी सर्वप्रथम स्पष्ट केला, त्यांच्यामते सामाजिक पर्यावरणात केलेली मनःपुर्वक व हेतूपुर्ण कृती वा उपक्रम म्हणजे योजना होय.'
-प्रकल्प पद्धतीचे प्रमुख वैशिष्टये म्हणजे कोणताही स्वीकृत व्यवसाय पुर्वनियोजित व निश्चित नसतो. जो उपक्रम विद्यार्थी स्वयंस्फूर्तपणे स्वीकारतात तोच त्यांचा व्यवसाय असतो. शिक्षक स्वतःची कोणतीही कल्पना विद्यार्थ्यांवर लादू शकत नाही. प्रकल्प हा पूर्णपणे सामुदायिक पद्धतीने पार पाडला जातो. तो पूर्ण करत असतांना त्यात काही अडचण आल्यास शिक्षक त्यांना मार्गदर्शन करतो.
३) सादरीकरण (Presentation) :
सादरीकरणालाच आशयाचे किंवा माहितीचे सादरीकरण असे म्हणतात. दैनंदिन जीवनात आपण अनेक कामे करतो. अनेक प्रकारे विचारांची, माहितीची देवाण-घेवाण होत असते. सामाजिक वातावरणात असे अनेक प्रसंग येतात की, आपल्याला आपले मत प्रत्यक्षपणे व्यक्त करावे लागते. काही सभा समारंभात, कार्यक्रमात सहभाग घ्यावा लागतो. त्यातूनच काही जबाबदाऱ्या आपल्याला सोपविल्या जातात. उदा. एखाद्या वक्त्याची कार्यक्रमाच्या सुरूवातीला ओळख करून देणे, आभारप्रदर्शन करणे, शोकसभेत सांत्वन करणे, भाषणे करणे, वादविवाद वक्तृत्व स्पर्धा, परिसंवाद, चर्चासत्र इ. सादरीकरणाची उदाहरणे होत.
शालेय स्तरांवर शिक्षक विविध प्रकारे सादरीकरणाच्या पध्दती वापरत असतात. एखाद्या विषय विद्यार्थ्यांना ठरवून दिला जातो. त्या विषयाची विद्यार्थी सखोल तयारी करतात व वर्गात सर्वांसमोर सादर करतात. उदा. वादविवाद स्पर्धा, वक्तृत्त्व स्पर्धा ही सादरीकरण पद्धतींची उदाहरणे आहेत. काही सादरीकरण प्रकारात शिक्षक एका विद्यार्थ्यांऐवजी २ ते ३ विद्यार्थ्यांचे गट केले जातात व त्यांना विषय ठरवून दिला जातो. त्यानंतर विद्यार्थी त्या विषयीची सखोल माहिती गोळा करतात व ती वर्गांसमोर क्रमाक्रमाने सादर करतात. उदा. स्वतःचे नाव, विषयाचे नाव, व्याख्या, प्रकार, वापरलेली साहित्य इ. हे सादरीकरण मौखिक व्याख्यान किंजवा संगणकाद्वारेही केले जाऊ शकते. हल्ली सादरीकरणासाठी संगणकातील Power Point चा वापर अधिक केला जातो.
४) संवाद पद्धती (Interactive Method) :
संवाद पद्धतीत एखादा ठराविक अभ्यासविषय दर्शविलेला असतो. त्याला विविध उपांगे असतात. ती उपांगे निश्चित करून प्रत्येक उपघटकावर पुराव्यांसह बोलू शकणाऱ्या तज्ञांची निवड केली जाते व त्या व्यक्तीला रितसर आमंत्रित केले जाते. प्रत्येक परिसंवादात ४ ते ५ तज्ञ व्यक्ती असतात. एका तज्ञ व्यक्तीची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. इतर तज्ञ नेमून दिलेल्या विषयावर निबंध तयार करून ठराविक वेळ मर्यादेत ते सादर करतात, नंतर चर्चा होते. अध्यक्ष या चर्चेचे संयोजन करतात. परिसंवादात विषयाचा सर्व बाजूंनी विचार व्हावा अशी अपेक्षा असते. तसेच व्यासपीठावर बसलेल्या तज्ञ व्यक्ती श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देवून त्यांच्याशी संवाद साधत असतात. अशा पद्धतीचे आयोजन माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरांवर केले जाते. अशा पद्धतीच्या आयोजनामुळे विद्यार्थी व शिक्षक, तज्ञ यांच्यात आंतरक्रिया घडून येत असतात. तज्ञ व्यक्ती विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे देतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या विषयाचे सखोल व विस्तृत ज्ञान मिळते.
Social Plugin